पोस्टातून १२ हजार भाऊरायांपर्यंत पाेहोचल्या राख्या; महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही रत्नागिरीतून रवाना
By शोभना कांबळे | Published: August 30, 2023 05:06 PM2023-08-30T17:06:37+5:302023-08-30T17:07:46+5:30
शाेभना कांबळे रत्नागिरी : भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या, त्यांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढविणाऱ्या, आवडत्या रक्षाबंधन सणासाठी जिल्ह्यातील बहिणींनी ...
शाेभना कांबळे
रत्नागिरी : भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करणाऱ्या, त्यांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढविणाऱ्या, आवडत्या रक्षाबंधन सणासाठी जिल्ह्यातील बहिणींनी रत्नागिरी टपाल कार्यालयावर विश्वास टाकत तब्बल आपल्या १२ हजार भाऊरायांपर्यंत राख्या पोहोच केल्या आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यांमध्ये पोस्टाच्या आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफ्यामधून या राख्या पाठविण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी विभागाने जिल्ह्यासाठी ३ हजार विशेष अशा आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफ्यांची मागणी केली होती. हे आकर्षक, वाॅटरप्रूफ लिफाफे केवळ दहा रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले होते. पोस्टाच्या सर्व कार्यालयात हे लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. गतवर्षीही पोस्टाच्या या आकर्षक लिफाफ्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
एका लिफाफ्यात मोठ्या दोन आणि लहान तीन ते चार राख्या राहू शकतील अशा प्रकारे हे आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफे मागविण्यात आले होते. टपाल खात्याने तब्बल २१ दिवस आधी हे लिफाफे उपलब्ध करून दिले असल्याने या राख्या पाठविण्यासाठी बहिणींना मुबलक वेळ मिळाला. या राख्यांच्या मेल बॅगेला वेगळे लेबल लावले होते. त्यामुळे वितरण करताना राख्यांच्या बॅगा अधिक सुरक्षितरीत्या पोहोच झाल्या.
गेल्या वर्षी २९९० एवढ्या राख्या रत्नागिरी जिल्ह्यातून रवाना झाल्या होत्या. हे लक्षात घेऊन येथील पोस्ट कार्यालयाने यंदा ३००० विशेष लिफाफ्यांची मागणी केली हाेती. यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, साध्या दोन हजार पाकिटांतूनही नागपूर, सोलापूर, अमरावती, कुडाळ, पुणे, कोल्हापूर, सातारा, मिरज, मुंबई आणि गोवा राज्यातही राख्या पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही तब्बल सात हजार राख्या पोस्टाच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या आहेत. यंदाही पोस्टाने बहिणींच्या राख्या वेळेवर पोहोच केल्या आहेत.
पोस्टाची हायटेक सेवा आता सर्वदूर
स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामान्य नागरिकांशी जोडलेली पोस्टाची नाळ अजूनही कायम आहे. आधुनिक काळानुसार पोस्ट विभागही आता हायटेक झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने ग्राहकांना जलद सेवा मिळत आहे. पोस्टाच्या सर्व सेवांना पसंतीही मिळत आहे.
रक्षाबंधनासाठी रत्त्नागिरी जिल्ह्यातून राख्या पाठविणाऱ्या भगिनींची संख्या जास्त आहे, हे लक्षात घेऊन यंदाही आकर्षक, रंगीत आणि वाॅटरप्रूफ लिफाफे मागविले हाेते. मात्र, या लिफाफ्यांबरोबरच साध्या लिफाफ्यातून मिळून बारा हजार राख्या महाराष्ट्रासह गोवा आणि अन्य राज्यांत पोहोचल्या आहेत. - नंदकुमार कुरळपकर, डाकघर अधीक्षक, रत्नागिरी