कुडावळेतील मोर्चात पाणी पेटले
By admin | Published: May 26, 2016 10:02 PM2016-05-26T22:02:40+5:302016-05-27T00:22:31+5:30
दापोली तालुका : आंदोलकांकडून तोडफोड; वृद्ध महिलेला अपशब्द उच्चारल्याने उद्रेक
दापोली : दापोली तालुक्यातील कुडावळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाणीप्रश्न गंभीर बनल्याने नदीकिनाऱ्यावर असणाऱ्या खासगी व व्यावसायिक विहिरींच्या प्रश्नाने उग्ररूप धारण केले. ग्रामस्थांनी काढलेल्या शांततापूर्वक मोर्चातील एका वृध्द महिलेला खासगी विहिरीवर कामाला असलेल्या कर्मचाऱ्याने अवमानकारक शब्द वापरल्यानंतर आंदोलकांचा राग अनावर झाला. आंदोलकांनी नदीच्या लगत बांधलेल्या व पाण्याने भरलेल्या विहिरीची पाणीउपसा करणारी मोटार, पाण्याच्या टाक्या व जलवाहिन्या जांभा चिरा टाकून तोडून टाकल्या. यामुळे येत्या काही दिवसांत गावातील पाणीप्रश्न गंभीर रूप धारण करण्याची चिन्ह दिसत आहेत.
कुडावळे गावाच्या मध्यातून वाहणाऱ्या नदीवर एका ठिकाणी सिमेंटचा बांध बांधण्यात आला आहे. या बांधात नदीतील पाणी अडवण्यात येते व ग्रॅव्हिटीने एका टाकीत सोडण्यात येते. या टाकीला बसवण्यात आलेल्या नळांद्वारे लगतच्या गावठणवाडी, बौध्दवाडी व तेलीवाडी या तीन वाड्यांतील ग्रामस्थ बारा महिने पाणी भरतात. मात्र, काही वर्षांपूर्वी या नदीच्या पात्राजवळ तब्बल तीन खासगी विहिरी व एक मोठी तळी बांधण्यात आली. या विहिरींना ग्रामपंचायतीची परवानगी नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या विहिरी नदीच्या पात्राच्या व पाण्याच्या पातळीच्या खाली बांधण्यात आल्या आहेत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळे नदीतील नैसर्गिकरित्या वाहणारे झरे आटले आहेत. शिवाय जमिनीच्या खालून वाहणाऱ्या झऱ्यांतील पाणी या लगतच्या विहिरी व नव्याने बांधण्यात आलेल्या तळ्यांमध्ये येत असल्याने बारमाही वाहणारी नदी यावर्षी उन्हाळ्यात एकदम आटली. यामुळे सिमेंटच्या बंधाऱ्यात पाण्याच्या तुटवडा निर्माण झाल्याने तीन वाड्यांचे पाण्यासाठी हाल सुरू झाले, असे ग्रामस्थांनी पत्रकारांना सांगितले.
गावातील खासगी विहिरींमध्ये पाणी असून, लगतच्या काही वाड्या तहानलेल्या राहात असल्याने यावर तोडगा काढण्याकरिता ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. यावर तहसीलदारांनी २२ मे रोजी स्थळपाहणी करण्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यांच्या आदेशानुसार २२ मे रोजी सोमवारी मंडल अधिकारी जी. ए. खामकर, तलाठी एस. के. सानप आणि ग्रामसेवक आर. जी. गोलांबडे हे घटनास्थळी पाहणी करण्याकरिता गेले. तेथे सकाळपासून तीनही वाड्यांतील ग्रामस्थ उपस्थित होते. अनेकांच्या हातात निषेधाचे फलक होते. सर्वजण घोषणा देत खासगी विहिरींवर पोहोचले. घोषणा दिल्यावर तेथे पाणी सोडण्याच्या कामाकरिता नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्याने त्याला कुणीतरी अपशब्द वापलल्याचा गैरसमज करून घेतला व त्याने बडबड सुरू केली. याचा राग आलेल्या आंदोलकांनी व महिलांनी मग मागचा पुढचा विचार न करता पंप हाऊसच्या लगत पडलेले जांभा दगडाचे चिरे तेथे ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवर, डिझेल पंपावर व जलवाहिन्यांवर टाकून ते फोडायला सुरूवात केली. काही मिनिटांत पाण्याची टाकी फुटून वाहू लागली, पाणी उपसा करणाऱ्या डिझेलच्या मोटरची दुरवस्था झाली व पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटल्या. यानंतर मोर्चेकऱ्यांनी आपला मोर्चा अन्य विहिरींकडे वळवला.
यावेळी सरपंच वनिता रहाटवळ, उपसरपंच रेवती मोरे, माजी सरपंच महेश कदम, पोलीसपाटील सुरेंद्र दरेकर, विनायक कदम, अमोल कदम, दिनेश पवार, सरस्वती पवार, कुणाल पवार, प्रकाश पवार, संतोष राऊत, विद्याधर कदम, बाजीराव कदम, विठोबा कदम, बाळकृष्ण कदम, रेखा जाधव, नंदा पवार, सचिन पवार, मनीषा राऊत, दीपक पवार, हरिश्चंद्र किरवेकर, उदय पवार, राऊजी पवार हे ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शासकीय पाहणी : अहवाल पाठविणार
नदीच्या पात्राच्या जवळ बांधण्यात आलेल्या सर्व विहिरी व तळ्यांची शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर पाहाणी झाली. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना नदीचे पात्र कोरडे व लगतच्या खासगी व व्यावसायिक उपयोगाकरिता बांधण्यात आलेल्या विहिरी पाण्याने भरलेल्या आढळून आल्या. हा वस्तुस्थिती दर्शक अहवाल आपण तातडीने तहसीलदारांकडे पाठवणार असल्याचे सांगण्यात आले.