रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी अंशकालीन स्त्री-परिचरांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:10 PM2018-07-06T15:10:18+5:302018-07-06T15:12:25+5:30
अंशकालिन स्त्री परिचरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ या आंदोलनामध्ये जिल्हाभरातून शेकडो अंशकालीन स्त्री परिचर सहभागी झाल्या होत्या़
रत्नागिरी : अंशकालिन स्त्री परिचरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ या आंदोलनामध्ये जिल्हाभरातून शेकडो अंशकालीन स्त्री परिचर सहभागी झाल्या होत्या़
आजचे आंदोलन या संघटनेच्या राज्य संघटक डॉ़ सुरेखा पाटोळे आणि जिल्हाध्यक्षा मनाली कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडले़ जिल्हाभरातील अंशकालीन स्त्री-परिचरांची सन १९७१पासून उपकेंद्रांमध्ये महिना ३० रुपये मानधनावर नेमणूक करण्यात आली होती़ मात्र, या नेमणुकानंतर आरोग्य विभागाला या परिचरांचा विसर पडल्याचा आरोप संघटनेने केला आहे़.
केवळ काम करुन घेणे, बाळंतपण करणे, त्यांची स्वच्छता व उपकेंद्राची स्वच्छता, आरोग्य सेविकेबरोबर फिरती करणे, सहा राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभाग, पाणी नमुने घेणे आदी कामे करुन घेतली जातात़ एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे करुन घेतली जात असतानाही केवळ १२०० रुपये मानधनावर त्यांची बोलवण केली जात आहे़
अंशकालिन स्त्री परिचरांनी याविरोधात अनेकदा आवाज उठविला़ त्यानंतर आरोग्य विभागाने २ मे, २०१७ रोजी मिटिंग घेऊन ६००० रुपये मानधन मिळावे, अशी मागणी केली़ होती. त्याबाबतचा प्रस्तावही मंजूर करुन वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता़ परंतु हा प्रस्ताव गेले वर्षभर वित्त विभागाकडे धूळखात पडून आहे.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षनेते असताना त्यांनीही स्वत: पगारवाढीसंदर्भात शासनाला निवेदन दिले होते़ मात्र, सत्तेत आल्यावर ते आता दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे़ त्याचबरोबर अंशकालीन स्त्री परिचर उद्या शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत़