राम जन्मोत्सव साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:31 AM2021-04-22T04:31:57+5:302021-04-22T04:31:57+5:30
खेड : तालुक्यातील सुकिवली येथील श्रीकांत चाळके यांच्या निवासस्थानी बुधवारी श्रीराम जन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घरगुती स्वरूपात ...
खेड : तालुक्यातील सुकिवली येथील श्रीकांत चाळके यांच्या निवासस्थानी बुधवारी श्रीराम जन्मोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घरगुती स्वरूपात सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते. यावेळी कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत उत्सव साजरा केला.
मोबाईल टेस्टिंग व्हॅन
खेड : खेड नगर परिषद व तालुका आरोग्य विभाग यांच्यामार्फत मोबाईल टेस्टिंग व्हॅनची सुविधा उपलब्ध केली आहे. फळविक्रेते, भाजी, दूध विक्रेते, होम डिलिव्हरी व्यावसायिक, मेडिकल स्टोअर्स यांनी आरटीपीसीआर / आरएटी टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.
श्रीराम जन्मोत्सव रद्द
चिपळूण : शिरळ - मालघर येथील श्री लक्ष्मीकेशव देवस्थानचा दरवर्षी गुढी पाडव्यापासून सुरू होणारा व चैत्र शुद्ध दशमीपर्यंत चालणारा श्री राम जन्मोत्सव यावर्षीही उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला. कोणत्याही प्रकारचा जाहीर कार्यक्रम, उत्सव किंवा महाप्रसाद झाला नाही. गतवर्षीही कोरोनामुळे सदर उत्सव रद्द केला होता.
ऑनलाईन रामनाम जागर स्पर्धा
खेड : राम नवमीनिमित्त बुधवारी शहरापुरती मर्यादित ऑनलाईन अखंड राम नाम जागर स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा १ ते १५ वर्षांपर्यंत तसेच महिला व पुरुष खुल्या गटात घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी एक मिनिटाचा राम नामाचा जप केलेला व्हिडिओ पाठवत सहभाग घेतला.
नुकसानग्रस्तांना भरपाई द्या
खेड : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कांदोशी धनगरवाडीतील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्या, अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे. १५ एप्रिल रोजी झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा कांदोशी- धनगरवाडीला मोठा फटका बसला आहे.
चोरद नदीपात्रात धुतात वाहने
खेड : तालुक्यातील ५ गावे ७ वाड्यांना ज्या चोरद नदीपात्रातून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याच नदीपात्रात वाहने धुणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. संचारबंदीचा फायदा उठवून वाहनचालक सर्रास नदीपात्रात वाहने धुवत असल्याने पाणी दूषित होत आहे. नजर चुकवून नदीपात्रात वाहने धुणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. चोरद नदीपात्रातून टंचाईग्रस्त गावे व वाड्यांना वर्षानुवर्षे पाणीपुरवठा केला जातो.
अन्नधान्याचे किट्स वाटप
चिपळूण : शहरातील ‘रॉक फिटनेस जिम’च्या संचालिका प्रियांका मिरगावकर यांच्यातर्फे कोरोना काळात गरजूंना अन्नधान्याचे किट्स वाटप करण्यात येत आहेत. अन्नधान्याची २०० किट्स वाटप करण्याचे त्यांचे नियोजन असून, त्यांनी या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. याआधीच्या लॉकडाऊनमध्येही त्यांनी अनेक कुटुंबियांना मदत केली होती.
पागमध्ये लसीकरण केंद्र हवे
चिपळूण : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लसीकरण वाढविण्याची गरज आहे. शहराचा भाग मोठा असल्याने पाग विभागासाठी पाग मराठी शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी येथील स्थानिक नगरसेविका सई सुयोग चव्हाण यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. चिपळूण शहरातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गांभीर्याने घ्यावे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
पालिका दवाखान्यात लसीकरण
खेड : सध्या खेड शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खेड नगर परिषद दवाखान्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सोफिया शेख, रुपेश डंबे, नीलेश सकपाळ, अरुण जाधव आदी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पडला. यावेळी जवळपास १००हून अधिक नागरिकांनी लसीकरणात सहभाग घेतला.
लसींची संख्या वाढवून मिळावी
चिपळूण : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लसीकरणाला गती देण्यात आली आहे. आता लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. अपरांत हॉस्पिटलमध्ये पाच हजार नागरिकांनी नोंद केली आहे. मात्र, लस मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अपरांत हॉस्पिटलमध्ये कोविड लसीची संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी हॉस्पिटलच्या संचालकांसह रोटरी क्लब, चिपळूणच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.