प्रतीकात्मक जादूटोणा करत मंडणगडमध्ये रामदास कदम यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 03:46 PM2019-09-14T15:46:09+5:302019-09-14T15:48:44+5:30
मंडणगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत रामदास कदम यांच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषण्यांच्या गजरात निदर्शने केली.
मंडणगड/रत्नागिरी : पर्यावरणमंत्री रामदास कदम हे बंगाली बाबांना सोबत घेऊन फिरतात व जादूटोणा करतात. त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मंडणगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसमार्फतरामदास कदम यांच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषण्यांच्या गजरात निदर्शने केली.
पालकमंत्री रामदास कदम यांच्या २९ आॅगस्टच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली होती. प्रत्युत्तरादाखल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काका शिगवण यांना मारहाण केली. याबाबत मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली, पण गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.
अखेर १२ दिवसानंतर गुन्हा नोंद केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी रॅली काढून रामदास कदम यांना अटक करा, या मागणीसाठी निदर्शने केली. मंडणगड तहसीलदार कार्यालयावर कार्यकर्त्यांनी मोर्चाने जाउन निवेदन दिले.
कोकणात बंगाली बाबांचे आगमन होत आहे, सावध राहा, गावोगावी खोटी पत्रे पाठविणाऱ्या पर्यावरण मंत्र्यांचा निषेध, लोकांची दिशाभूल करणाऱ्या मंत्र्यांचा जाहीर निषेध, कोकणाला शिव्या घालणाऱ्या मंत्र्यांचा निषेध असे फलक घेउन कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
गेल्या आठवड्यात लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या रात्रीस खेळ चाले या बातमीच्या पोस्टरचा या रॅलीत समावेश करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक जादूटोणा करत रामदास कदम यांचा निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, जिल्हा परिषद सदस्य उमेद जाधव, पंचायत समिती सदस्य महामूलकर, काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, राजाराम लेंडे आदी उपस्थित होते.