रामदास कदम-सूर्यकांत दळवी यांचे पक्ष बदलले, तरी संघर्ष सुरूच! आता संघर्षाचा नवा अध्याय
By मनोज मुळ्ये | Published: March 19, 2024 10:02 AM2024-03-19T10:02:29+5:302024-03-19T10:15:44+5:30
दापाेलीत भाजप वाढविण्यासाठी दळवी यांनी पुढाकार घेतला आहे
मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: सर्व पक्ष संपवून भाजपला एकट्यालाच शिल्लक राहायचे आहे का, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आणि राज्यात खळबळ उडाली. आपली ही टीका वरिष्ठ नव्हे तर स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी होती, असेही त्यांनी नंतर सांगितले. त्यांचा रोख माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर होता आणि त्यातूनच दापोली विधानसभा मतदारसंघात कदम आणि दळवी यांच्यातील संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
१९९० साली रामदास कदम खेडमध्ये आणि सूर्यकांत दळवी दापोलीतून आमदार म्हणून विजयी झाले. १९९०, ९५, ९९, २००४ असे दोघे आपापल्या मतदारसंघात विजयी झाले. २००९ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर कदम यांना गुहागरमधून निवडणूक लढवावी लागली. त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून दोघांत वाद सुरू झाले. आपल्या मुलाला, योगेश कदम यांना दापोलीतून उभे करायचे असल्याने २०१४ साली मला पाडण्यात आल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी अनेकदा केला. रामदास कदम यांनीही २००९च्या पराभवाला सूर्यकांत दळवी यांना जबाबदार धरले. पुढे दळवींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे रामदास कदम यांच्या शिवसेनेशी (शिंदे गट) भाजपची युती असल्याने या दोघांतील संघर्षाचा नवा अध्याय सुरू आहे.
...म्हणून आगपाखड
दापाेलीत भाजप वाढविण्यासाठी दळवी यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटनाचे काही कार्यक्रम केले. मंडणगडमधील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी चव्हाण यांच्याकडे बैठक लावली. यामुळे रामदास कदम चिडले आहेत. लोटे येथील सभेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर केलेली आगपाखड ही याच रागातून होती.