रामदेव बाबा येत्या बुधवारी रत्नागिरीत, योग शिबिराला २० हजाराची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 01:49 PM2022-03-07T13:49:18+5:302022-03-07T13:50:39+5:30
रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे पहाटे ५ वाजता प्रात:कालीन योग शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर विनामूल्य.
रत्नागिरी : जागतिक महिला दिनानिमित्त दि. ९ मार्च रोजी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे पहाटे ५ वाजता प्रात:कालीन योग शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर विनामूल्य असून, या शिबिराला २० हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती पतंजली याेगपीठ हरिद्वारच्या महिला केंद्रीय प्रभारी सुधा अळ्ळीमाेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यानंतर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे सकाळी ९ वाजता प्रांतिक महिला संमेलन होणार असल्याचेही सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले. ११ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रत्नागिरीकरांना रामदेव बाबा यांच्या सानिध्यात योग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. रत्नागिरी शहराच्या आसपासच्या २० किलोमीटर परिसरातून येणाऱ्यांसाठी पतंजलीतर्फे मोफत एसटी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. कोतवडे, बसणी, केळ्ये, मजगाव, हातखंबा, निवळी, लांजा, नाचणे, कुवारबांव, गणपतीपुळे, पावस, फणसोप, गोळप, पेठकिल्ला, गावखडी येथून बसेसची सुविधा उपलब्ध आहे. शिबिरासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी स्टेडियमच्या मागील भागात थिबा राजवाडा रस्त्यापर्यंत पार्किंग सुविधा उपलब्ध केली आहे. एसटी सुविधेबाबत शेखर खापणे यांच्याशी संपर्क साधावा.
महिला दिनानिमित्त वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे प्रांतिक महिला संमेलनात महिलांसाठी आरोग्यविषयक टीप्स, मुलांवर चांगले संस्कार व आनंदी निरोगी परिवार या त्रिसूत्रीय विषयावर रामदेव बाबा मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यासाठी हरिव्दारच्या साध्वी देवप्रियाजी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याशिवाय रामदेव बाबा यांचे शिष्य स्वामी परमार्थदेवजी, स्वामी आनंद देवजी उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेसाठी पतंजली समितीचे बापूसाहेब पाडाळकर, राज्य कार्यकारिणी सदस्या रमा जोग, जिल्हाध्यक्ष ॲड. विद्यानंद जोग उपस्थित होते. रत्नागिरीत आल्यानंतर रामदेव बाबा लोकमान्य टिळक स्मारक व पतितपावन मंदिराला भेट देणार आहेत.
योग शिबिरासाठी येताना आसन व्यवस्था, पाण्याची बाटली, रूमाल व चप्पल ठेवण्यासाठी कापडी पिशवी सोबत घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.