रमेश मोरे, जया जाधव यांच्या खुनाला वाचा फोडणार - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:26 PM2023-06-27T12:26:37+5:302023-06-27T12:27:11+5:30
माझ्याइतकी उद्धव ठाकरे यांची कुंडली कोण सांगू शकेल, असा प्रश्न त्यांनी केला.
राजापूर : रमेश मोरे व जया जाधव यांच्या खुनाला कारणीभूत कोण आहे, याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह जाहीर करणार असल्याचा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. दिशा सालियन व सुशांतसिंह राजपूत यांचा खूनच झाला आहे, असा आरोप पुन्हा एकदा करत त्यांनी येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत हे तुरुंगात जातील, असे सूतोवाचही केले.
सोमवारी सायंकाळी राजापूर हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या भाजपच्या मोदी ॲट ९ या महाजनसंपर्क अभियानाची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील समारोपाची सभा झाली. त्यात ते बोलत होते. यावेळी आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, बांधकाममंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री राणे यांनी ठाकरे शिवसेनेवर कडाडून टीका केली. मी ३९ वर्षे शिवसेनेत काढली आहेत आणि मी कायम ‘मातोश्री’च्या आत होतो. त्यामुळे माझ्याइतकी उद्धव ठाकरे यांची कुंडली कोण सांगू शकेल, असा प्रश्न त्यांनी केला. रमेश मोरे व जया जाधव यांच्या खुनाचे खरे सूत्रधार कोण, हे मला चांगलेच माहिती आहे. लवकरच याबाबत पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.
या सभेत आमदार नितेश राणे, आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, मंत्री रवींद्र चव्हाण यांचीही भाषणे झाली.
उरलेसुरलेही संपतील
आता शिवसेना संपली आहे. त्यांचा जास्त विचार करू नका. आता केवळ ५ खासदार व १५ आमदार उरले आहेत. येत्या निवडणुकीत तेही नसतील. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकांमधील विजयासाठी मतांच्या बेरजेचे गणित करा, असे आवाहन नारायण राणे यांनी केले.
लवकरच तुरुंगात जातील
अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले. त्यांनी लोकहिताचे काय निर्णय घेतले, असा प्रश्न करतानाच त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले. दिशा सालियन व सुशांतसिंह राजपूत यांची हत्याच झाली आहे व त्याचे पुरावे आपण संबंधित यंत्रणांना दिले आहेत, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.