Ratnagiri- 'रामगड' हा फक्त डोंगरच, खेड तालुक्यातील नव्या किल्ल्याच्या शोधाचा दावा ग्रामस्थांनी फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 03:15 PM2023-03-29T15:15:05+5:302023-03-29T15:15:40+5:30
कुठल्यातरी माहितीच्या आधारावर संभ्रमावस्था करणे हे योग्य नाही
खेड : तालुक्यातील घेरापालगड या किल्ल्याच्या जवळच रामगड असल्याचा दावा काही दुर्ग अभ्यासकांनी केला आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी हा दावा फेटाळून लावत रामगड हे घेरापालगडच्या बाजूच्या डोंगराचे फक्त नाव असल्याचे घेरापालगडचे सरपंच तसेच त्या किल्ल्यावरील स्वराज्याच्या काळात असणाऱ्या सैनिकांचे वंशज गोपाळराव कदम यांनी सांगितले.
गाेपाळराव कदम यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला त्याच डोंगरावर किल्ला बांधण्याचे काम प्रस्तावित केले होते. मात्र, काही भौगोलिक कारणास्तव त्या ठिकाणाऐवजी शेजारील आता असणाऱ्या खेडमधील घेरापालगड या ठिकाणी किल्ला बांधला. घेरापालगड हा किल्ला टेहळणीसाठी बांधला गेला होता. स्वराज्याची राजधानी असलेला रायगड, दापोली तालुक्यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असणारा किल्ला रसाळगड हे तीनही किल्ले या घेरापालगड किल्ल्यावरून दिसतात.
हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ला आणि खेडमधील रसाळगड किल्ला याच्या मधोमध असणारा हा घेरापालगड किल्ला त्यावेळी विश्रांतीसाठी आणि टेहळणीसाठी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराजांनी बांधला होता. इतिहास संशोधक या ठिकाणी येऊन या किल्ल्याच्या व्यथा मांडत असेल. या किल्ल्याबाबत असणारे संदर्भ शोधत असेल तर त्यांचे स्वागत आहे. मात्र, कुठल्यातरी माहितीच्या आधारावर संभ्रमावस्था करणे हे योग्य नाही.
त्यांना जर काही संदर्भ सापडले असतील तर त्यांनी सर्वात आधी ऐतिहासिक गाव असलेल्या घेरापालगड किल्ले माची या ठिकाणी असणाऱ्या जुन्या लोकांना विचारणे अपेक्षित होते. पूर्वापार आम्ही जे ऐकत आलो, त्यानुसार घेरापालगडच्या पश्चिमेला असणारा डोंगराचा सुळका या ठिकाणी रामगड म्हणून पूर्वापार पिढ्यानपिढ्या प्रचलित परिसर आहे, असेही कदम यांनी सांगितले.
घेरापालगड किल्ल्याची अवस्था आज दयनीय आहे. याकडे सर्वात आधी शासनाने लक्ष केंद्रित करावे. ज्या ठिकाणी काहीच नाही, त्याठिकाणी काहीतरी होतं, असे सांगून संभ्रम निर्माण करू नये. तसेच न पटणारी माहिती समोर आणून छत्रपतींच्या इतिहासाला उजाळा मिळणार नाही तर छत्रपतींनी बांधून उभे केलेले किल्ले सर्वात आधी दुरुस्त करावेत. त्यांची डागडुजी करावी. - गाेपाळराव कदम, सरपंच, घेरापालगड.