रामपूरला लागलीय कायापालटाची आस

By admin | Published: December 12, 2014 10:13 PM2014-12-12T22:13:17+5:302014-12-12T23:41:04+5:30

संसद आदर्श ग्राम योजना : हुसेन दलवाई यांच्याकडून गावविकासाचा गाडा पुढे हाकला जाणार

Rampur is about to change | रामपूरला लागलीय कायापालटाची आस

रामपूरला लागलीय कायापालटाची आस

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावयाचा आहे. ‘आदर्श सांसद ग्राम’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेसाठी खासदार हुसेन दलवाई यांनी चिपळूण तालुक्यातील रामपूर गावाची दत्तक ग्राम म्हणून निवड केली आहे. कसे आहे हे रामपूर, तिथं नेमकं काय आहे, तिथल्या लोकांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत, तिथलं सध्याचं राहणीमान कसं आहे, याविषयी ‘लोकमत’ने घेतलेला थोडक्यात आढावा...
सुभाष कदम - चिपळूण तालुक्यातील रामपूर या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गुहागर-विजापूर राज्य मार्गावरील हे गाव पूर्वी इब्राहिमपूर या नावाने परिचित होते. येथे मुस्लिम वस्ती होती. परंतु, हिंदुराव घोरपडे यांनी ३५० वर्षांपूर्वी हल्ला करुन हे गाव जिंकून घेतले आणि या गावाचे नाव इब्राहिमपूरचे रामपूर झाले. या गावात घोरपडे म्हणजेच आताचे असणारे चव्हाण होय, असे सांगितले जाते.
गाव राज्य महामार्गावर असल्याने या गावाची प्रगती पूर्वीपासूनच होत आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जेव्हा आरोग्य केंद्र उभारण्यात आली तेव्हा रामपूर आरोग्य केंद्र अस्तित्त्वात आले. शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातही गाव आघाडीवर आहे. प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानुसार काँग्रेसचे नेते व मिरजोळीचे सुपुत्र खासदार हुसेन दलवाई यांनी रामपूर गाव दत्तक घेतले.
या गावचा चेहरामोहरा लोकसहभागातून बदलण्याचे शिवधनुष्य खासदार दलवाई यांनी हाती घेतले आहे. या योजनेच्या माध्यमातून गावात सिंचन, शिक्षण, आरोग्य व भौतिक विकासाच्या सोयी उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
सरपंच महेश कातकर, उपसरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, विशेष कार्यकारी अधिकारी असणारे सुरेश साळवी, ग्रामसेवक सुधीर झिंबर यांनी १ डिसेंबरला हिवरेबाजार येथे जाऊन पोपटराव पवार यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. आदर्श गाव संकल्पना कशी राबवायची,े याबाबत सविस्तर माहिती या प्रशिक्षणात मिळाली असून, ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही ही योजना राबविणार आहोत. खासदार दलवाई यांनी आम्हाला ही संधी प्राप्त करुन दिली आहे. या संधीचे सोने आमचे ग्रामस्थ करतील, असा आशावाद सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केला आहे. गटविकास अधिकारी गणेश पिंपळे व सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे, असेही सरपंच कातकर यांनी सांगितले.


सरपंचांचे इंग्रजीतून भाषण...
संसद आदर्श ग्राम अभियान समितीचे स्वागत सरपंच महेश कातकर यांनी इंग्रजीतून केले. या कमिटीतील सदस्य दक्षिण भारतीय असल्याने त्यांना मराठीतून समजणे अवघड जाईल म्हणून सरपंच कातकर यांनी आपल्या गावच्या व्यथा व गावच्या समस्या इंग्रजीतून त्यांच्यासमोर मांडल्या. त्यामुळे समिती सदस्य व ग्रामस्थ अवाक झाले.
ग्रामसचिवालय इमारत विकासाचा केंद्रबिंदू
रामपूरची लोकसंख्या २३९१ असून, गावात कातकरवाडी, मराठवाडी, तांबी रोहिदासवाडी, वरची रोहिदासवाडी, बैकरवाडी, गावणंगवाडी, अलाटेवाडी, तळ्याचीवाडी, गोसावीवाडी, आवटेवाडी, चव्हाणवाडी, बौद्धवाडी, कुंभारवाडी, काळकाईनगर (शिक्षक कॉलनी) अशा १४ वाड्या आहेत. ग्रामसचिवालयाच्या अद्ययावत इमारतीतून गावचा कारभार चालतो. मंडल अधिकारी, तलाठी कार्यालयही येथेच आहे.
राजकीय क्षेत्रात फारशी संधी नाही
गाव रस्त्यानजीक असूनही राजकीय क्षेत्रात गावाला फारशी संधी मिळाली नाही. अपवाद दर्शना दशरथ चव्हाण व जितेंद्र लक्ष्मण चव्हाण या दोघांना चिपळूण तालुक्याचे सभापतीपद भूषविण्याची संधी मिळाल्याचा.
केंद्रीय समितीची भेट
दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी केंद्रीय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रामपूर ग्रामसचिवालय, रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र व मिलिंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, रामपूर येथे भेट देऊन माहिती घेतली. सरपंच महेश कातकर, उपसरपंच सुरेश साळवी व ग्रामविकास अधिकारी सुधीर झिंबर यांनी समितीचे स्वागत केले व आवश्यक ती माहिती समितीला दिली. या केंद्रीय समितीचे प्रमुख डॉ. रघुरामन, लक्ष्मीदेवी व व्हर्गिस यांच्याबरोबर जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे उपअभियंता जोगदंडे, गटविकास अधिकारी पिंपळे, बांधकामचे उपअभियंता जालिंदर मोहिते, पाणी पुरवठा उपअभियंता संदेश जंगम, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, कृषी अधिकारी विनोदकुमार शिंदे उपस्थित होते.


तळ्याची वाडी
रामपूर तळ्याचीवाडी -
बसपाचे सुरेश गमरे - ७९ मते
राष्ट्रवादीचे भास्कर जाधव - २२९
भाजपचे डॉ. विनय नातू - २४८ मते
शिवसेनेचे विजयकुमार भोसले - ९२
काँग्रेसचे संदीप सावंत - २४ मते
डॉ. नातू - १९ मतांची आघाडी
रामपूर कातकरवाडी -
सुरेश गमरे - ७ मते
भास्कर जाधव - २७० मते
डॉ. विनय नातू - १६२ मते
विजयकुमार भोसले - ८२ मते
संदीप सावंत - ८ मते
भास्कर जाधव-१0८ मतांची आघाडी


नव्या योेजना
गावात लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. येथे दुबार पीकासाठी पाण्याची योजना आवश्यक आहे.
तांबी धरणातून संपूर्ण गावाला दुबार शेतीसाठी पाणी पुरवठा करावा.
तांबी येथे धरणावर मगर पार्क व बोटिंग सुरु केल्यास पर्यटक मोठ्या संख्येने येतील.
येथे अद्ययावत पिकअप शेड व कायमस्वरुपी एस. टी. आरक्षण केंद्र उपलब्ध व्हावे.
सध्या गावात ३३ सौरदीप व ५० पेक्षा जास्त स्ट्रिट लाईट आहेत. ही संख्या वाढणे गरजेचे आहे.
महामार्गावर रामपूर येथे वरिष्ठ महाविद्यालय व्हायला हवे.
गावात आठवडा बाजार व्हायला हवा. रामपूर हे ४० गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे.
अद्ययावत अशी सर्व सोयींनी युक्त रुग्णवाहिका रामपूर येथे उपलब्ध होणे गरजेचे आहे.
आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर झाल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्येत वाढ हवी.
तांबी, रामपूरला विकासाची मोठी संधी आहे. मात्र, त्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे.


गावात...
प्राथमिक शाळा - ५
अंगणवाड्या - ५
इंग्रजी माध्यमाची नर्सरी - १
माध्यमिक व
ज्युनिअर कॉलेज - १
प्राथमिक आरोग्य केंद्र - ३
खासगी दवाखाने -३
पोस्ट आॅफीस - १
बँका - २
पोलीस दूरक्षेत्र - १
विविध कार्यकारी सोसायटी - १
ग्रामदेवतेची मंदिरे - ३
सहाण - ३
मंदिरे - ११

Web Title: Rampur is about to change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.