जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही : राणे
By admin | Published: August 29, 2014 10:27 PM2014-08-29T22:27:46+5:302014-08-29T23:10:02+5:30
टेरव वेतकोंडवाडी येथील पेयजल योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी
चिपळूण : मतदार संघातील विकासकामे आम्ही करायची, राज्य व केंद्र शासनामार्फत कोट्यवधीचा विकासनिधी आणायचा आणि त्यांनी श्रेय घ्यायचे. त्यामुळे अशा खासदाराला व आमदारांना जाब विचारा. येथील आमदारांनी पाच वर्षात कोणते काम केले? कोणाला नोकरीला लावले? कोणता उद्योग आणला? असा प्रश्न करून आम्ही जनतेसाठी झटत आहोत, याची सर्वांनी जाणीव ठेवा. येथील जनतेला आपण वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन माजी खासदार नीलेश राणे यांनी दिले.
टेरव वेतकोंडवाडी येथील पेयजल योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत, बंटी वणजू, रामदास राणे, विलास खेराडे, प्रभाकर जाधव, दादा बैकर, खेर्डीचे सरपंच नितीन ठसाळे, पंचायत समिती सदस्या ऋचा म्हालीम, शिवराम पंडव उपस्थित होते.
राणे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम व आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वेतकोंडचा रखडलेला रस्ता येथील आमदार का करू शकले नाहीत. निधी आम्ही आणायचा आणि श्रेय यांनी घ्यायचे काय? हा कुठचा न्याय? आम्ही जनतेसाठीच झटत असतो, याची जाणीव ठेवा. विकासासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू. जी चूक लोकसभेच्या निवडणुकीत केलीत, ती विधानसभेत करू नका. निकम यांच्या पाठिशी राहा, आम्ही सर्व आपले प्रश्न निश्चितपणे सोडवू, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम म्हणाले की, एक खासदार म्हणून गावागावात, वाडीवस्तीत फिरणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून राणे यांची ओळख आहे. येथील जनतेने एक धावणारा खासदार पाहिला. त्यामुळे पुढील पाच वर्षांनंतर राणे हेच पुढचे खासदार असतील, असा आपला विश्वास आहे. कारण काम करणाऱ्या माणसाला यश मिळत असते. याप्रसंगी वेतकोंडवाडी ग्रामस्थांतर्फे राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला एकनाथ माळी, विलास तांबे, बबन पंडव, प्रकाश साळवी, प्रदीप उदेग, सुहास मोहिते व वेतकोंड ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)