राणेंचा राजीनामा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

By admin | Published: July 21, 2014 11:25 PM2014-07-21T23:25:23+5:302014-07-22T00:10:20+5:30

राणे यांच्या घुसमटीने कार्यकर्ते संभ्रमात

Ranee resigns Congress workers jivari | राणेंचा राजीनामा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

राणेंचा राजीनामा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

Next

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे कॉँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, राजीनाम्याचा हा विषय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. राणे यांच्या राजीनाम्यामुळे कोकण विकासाला खीळ बसणार असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

राणे यांच्या घुसमटीने कार्यकर्ते संभ्रमात
उद्योगमंत्री नारायण राणे हे कर्तृत्ववान नेते आहेत. प्रशासन चालवण्याची त्यांच्यात धमक आहे. ते उत्कृष्ट संघटक आहेत. असे असताना पक्षाने त्यांना दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे त्यांची घुसमट झाली. त्यांच्याबरोबरच त्यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची किती घुसमट झाली असेल, याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करावा. शेवटी सत्ता लोकांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी राबवायची असते. मग ती ग्रामपंचायत असो की विधानसभा. सत्ता ही पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या हितासाठी असते. याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करायला हवा. राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देताना जी कारणे सांगितली आहेत ती पटण्यासारखी आहेत. प्रशासन व संघटना ही दोन्ही चाके बरोबर चालावी लागतात. त्याचे यश निवडणुकीत मिळत असते.
- रामदास राणे, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस

राणे तेथे आम्ही...
कोकणात उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने काँग्रेसची ताकद वाढत होती. परंतु, त्यांच्या घुसमटीवर पक्षाने गांभीर्याने इलाज केला नाही. त्यांना दिलेला शब्द वेळीच पाळला गेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. कोकणच्या विकासासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांच्यामुळेच कोकणात काँगे्रसचे अस्तित्व निर्माण झाले व युतीची ताकद कमी झाली होती. अशा नेत्याला काँग्रेसने पक्षापासून दूर ठेवणे पक्षहिताचे नाही. त्यामुळे नारायण राणे जेथे असतील त्यांच्याबरोबर आम्ही असू.
- संदीप सावंत,
अध्यक्ष, चिपळूण तालुका काँग्रेस
त्यांचे उपकार विसरणार नाही...
उद्योगमंत्री नारायण राणे हे ज्या समाजात जन्माला आले त्या समाजातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या समाजबांधवांसाठी त्यांनी १६ टक्के आरक्षण मिळवून दिले. त्यामुळे मराठा समाज त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. त्यांनी आज सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षापासून फारकत घेतलेली नाही. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राणे यांनी काम केले आहे. त्यामुळे पक्षाने त्यांचा राजीनामा सन्मानाने नाकारायला हवा. राणे यांची समजूत काढून त्यांना पुन्हा सक्रिय करायला हवे.
- सुरेंद्र माने,
जिल्हा उपाध्यक्ष, प्रदूषण नियंत्रण सेल, रत्नागिरी

सामान्य माणसाला राणे यांची गरज
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज (सोमवारी) मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. राणे नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु, पक्षश्रेष्ठी त्यांचा राजीनामा स्वीकारणार नाहीत. कोकणसह राज्यातील तळागाळातील जनतेला त्यांची गरज आहे. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष मुकेल, असे वाटत नाही. श्रेष्ठी त्यांची समजूत काढतील, अशी अपेक्षा आहे.
- मुधकर दळवी, उपसभापती,
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती

राणे धडाडीचे नेते
नारायण राणे हे कोकणचे धडाडीचे नेते आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, ही बाब दु:खदायक आहे. सच्चा कार्यकर्त्यांकडे कोकणात दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या कृतीने राणे यांनी कोकणातील सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज यानिमित्ताने उठविला असून, राज्यातील निवडणूक त्यांच्या नेतृत्त्वाखाली झाल्यास कॉँग्रेसला मोठे यश मिळेल.
- राजू भाटलेकर,
कॉँग्रेस कार्यकर्ता, रत्नागिरी

राणे कॉँग्रेसमध्येच हवेत
नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजिनामा देता कामा नये होता, असे आम्हालाही वाटते. राणेंसारखा मोठ्या ताकदीचा नेता कोकणात कॉँग्रेसमध्ये नसेल तर कोकणवासीयांच्या समस्या धाडसाने सरकारमध्ये मांडणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राणे हे कॉँग्रेसध्येच हवेत व त्यांचा योग्य तो सन्मान पक्षात व्हायला हवा.
-प्रसाद उपळेकर,
कॉँग्रेस कार्यकर्ता, रत्नागिरी

कोकणच्या विकासाला खीळ
उद्योगमंत्री नारायण राणे यांची पक्षात घुसमट झाली. वरिष्ठांनी दिलेला शब्द न पाळल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोकण विकासाला खीळ बसणार आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासात राणे यांचे योगदान मोठे आहे. ते जेथे असतील त्यांच्याबरोबर आम्ही सदैव राहू.
- परिमल भोसले, चिपळूण शहर अध्यक्ष इंदिरा काँग्रेस

Web Title: Ranee resigns Congress workers jivari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.