मस्कत येथे रंगला गणेशोत्सव
By admin | Published: September 10, 2014 10:39 PM2014-09-10T22:39:44+5:302014-09-11T00:11:12+5:30
उत्सव सातासमुद्रापार : खेडमधील दोनशे तरूण आले एकत्र
खेड : गणेशोत्सव आता सातासमुद्रापार गेल्याने त्याचे अनुकरण अनेकजण करू लागले आहेत. गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव मानला गेला असला तरीही एक सामाजिक उपक्रम म्हणून पाश्चात्य राष्ट्रदेखील त्यास विरोध करीत नसल्याचे समोर आले आहे. खेडमधील सुमारे २०० मराठी तरूणांनी चक्क ‘मस्कत’मध्ये या उत्सवाचे आयोजन केले आहे़
‘मस्कत’चा राजा मित्रमंडळ’ असे या तरूणांनी स्थापन केलेल्या मंडळाचे नाव आहे. गेली ४ वर्षे हे तरूण हा गणेशोत्सव साजरा करतात. खेड तालुक्यातील कर्जी येथील प्रवीण नीलेश शिंदे, प्रवीण निवळकर, भारत निवळकर, करंजाळी येथील प्रकाश म्हाप्रळकर, सोनगाव येथील हरिश्चंद्र मुंडेकर, गुहागरचे अनंत नाटुस्कर, सावर्डेचे गणेश धामणकर, भडवळेचे मनोहर नाचरे आणि माणगावचे सदानंद शिंदे आदी सुमारे २०० तरूण मस्कत येथील ‘अलतुर्की’ कंपनीत विविध पदावर काम करीत आहेत़
या तरूणांनी कंपनीने राहण्यासाठी दिलेल्या एका स्वतंत्र कक्षामध्ये गणेशोत्सव सुरू केला. विशेष म्हणजे या उत्सवानिमित्त हे सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत कंपनीच्या व्यवस्थापनाला प्रसाद देतात.
कोकणातील आणि विशेषत: खेड, गुहागर आणि माणगाव येथील या तरूणांचा आदर्श सर्व गणेशभक्तांना घेण्याजोगा आहे. गणेशोत्सव सुरू झाला की, हे सर्व तरूण कोकणातील आपल्या हितचिंतकांना आणि ओळखीच्या सर्वांनाच शुभेच्छा देतात़ यावर्षीही याची प्रचिती आली़
कंपनीचे नियमित काम करीत गणेशोत्सवानिमित्त कंपनीतील सर्वांना एकत्र येण्याचे कामदेखील हे तरूण करीत असल्याने त्यांचे मस्कतप्रमाणे भारतात आणि विशेषत: कोकणात सर्वत्र कौतुक केले जात आहे. (प्रतिनिधी)
गेली चार वर्षे सुरू आहे गणेशोत्सव.
खेडमधील दोनशे तरूण अलतुर्की कंपनीत विविध पदांवर कार्यरत.
कंपनीतर्फे राहण्यासाठी दिलेल्या स्वतंत्र कक्षात रंगला गणेशोत्सव.
खेड, गुहागर, माणगाव येथील तरूणांचे काम इतरांसाठी आदर्शवत.