´प्राणवायू रोखल्याने अन्य रुग्णांचे प्राण कंठाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:30 AM2021-05-01T04:30:28+5:302021-05-01T04:30:28+5:30

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णालयांखेरीज कोणत्याची खासगी रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा न करण्याचे आदेश दिले असून काही खासगी ...

रोखOther patients' lives are at stake by blocking oxygen | ´प्राणवायू रोखल्याने अन्य रुग्णांचे प्राण कंठाशी

´प्राणवायू रोखल्याने अन्य रुग्णांचे प्राण कंठाशी

Next

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णालयांखेरीज कोणत्याची खासगी रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा न करण्याचे आदेश दिले असून काही खासगी नाॅन कोविड रुग्णालयांना पुरवठा नाकारला आहे. त्यामुळे अन्य गंभीर आजारांचे रुग्ण यांचे प्राण धोक्यात आले आहेत. खासगी रुग्णवाहिकानांही गंभीर आजारांच्या रुग्णांना हलविण्यासाठी ऑक्सिजनची गरज असल्याने यासाठी स्वत: खर्च करण्याची तयारी करूनही या खासगी रुग्णवाहिकांना ऑक्सिजन पुरवठा नाकारल्याने अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी अन्य मोठ्या शहरात हलवायचे कसे, ही चिंता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. २९ एप्रिलपर्यंत सुमारे साडेसहाशे सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांमध्ये जेमतेम ३००० बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृहअलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र, गंभीर होणाऱ्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी मोठ्या प्रमाणावर खालावत आहे. त्यामुळे तालुक्यामधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड नसल्याने अशा गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय तसेच खासगी कोविड रुग्णालयांमध्ये हलवावे लागत आहे. परिणामी जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

सध्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला असून महिला रुग्णालयासह अन्य चार ठिकाणी प्लांट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सध्या जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयातील आरोग्य सेवा आणि अपुरे मनुष्यबळ यावर ताण येत आहे. सध्या गंभीर रूग्ण वाढल्याने ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णालयांखेरीज कोणत्याची खासगी रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा नाकारला आहे.

मात्र, अनेक प्रसूतिगृहे, अपघाती रुग्णांना सेवा देणारी खासगी रुग्णालये, शस्त्रक्रिया करणारी रुग्णालये तसेच आपद्ग्रस्तांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांमधील रुग्ण कधीही गंभीर होऊ शकतात. अशावेळी त्यांना तातडीचा ऑक्सिजन पुरवठा केला नाही तर त्याच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे या रुग्णालयांना ठरावीक प्राणवायूचा कोटा निश्चित करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या येथील शाखेने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात सध्या खासगी रुग्णवाहिका अन्य आजारांच्या गंभीर रुग्णांबरोबरच कोरोना रुग्णांना ग्रामीण भागातून रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये उपचारासाठी दाखल करण्याकरिता दिवसरात्र फेऱ्या मारत आहेत. गंभीर रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवताना रुग्णाला प्रवासादरम्यान तातडीने गरज लागल्यास अशा रुग्णवाहिकांमध्ये इतर आरोग्य सुविधांबरोबरच ऑक्सिजन सिलिंडरसोबत बाळगावा लागतो. मात्र, जिल्हा प्रशासनाने या खासगी रुग्णवाहिकांनाही ऑक्सिजन पुरवठा न करण्याचे आदेश दिल्याने या रुग्णवाहिकांची सेवाच धोक्यात आली आहे. गंभीर रुग्णांना विना ऑक्सिजन कसे हलवायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

दरम्यान, आरोग्य यंत्रणेतील या दोन मुख्य घटकांनाच जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा नाकारल्याने कोरोनाव्यतिरिक्त अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांच्या जिवाची प्रशासनाला फिकीर नाही का, अशी विचारणा रुग्णांच्या आप्तांकडून होत आहे.

कोट१

वरकरणी स्थिर दिसणारे रुग्ण अचानक गंभीर झाल्यास त्यांना प्राणवायू द्यावा लागू शकतो. प्रसूतीच्या रुग्णांचे अचानक सिझेरिअन करण्याची वेळ येते. नवजात शिशूंना प्राणवायू लागू शकतो. काेरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांबाबतच्या अडचणी लक्षात घेऊन नॉन कोविड खासगी रुग्णालयांनादेखील ठरावीक प्राणवायूचा कोटा देण्यात यावा, अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

डाॅ. नीलेश नाफडे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, शाखा रत्नागिरी.

कोट २

सध्या आम्ही कोरोनाच्या रुग्णांची ने-आण जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा अन्य मोठ्या शहरांमध्ये करत आहोत. सध्या गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन अत्यावश्यक बनला आहे. आतापर्यंत आम्ही आमच्या खर्चाने ऑक्सिजन सिलिंडर विकत घेऊन सोबत नेतो. मात्र, आता प्रशासनाने त्यालाही बंदी आणली आहे. त्यामुळे आम्ही रुग्णांना वाचविण्यासाठी शेकडो मैलाचा प्रवास करताना मध्येच त्याला ऑक्सिजनची गरज लागली तर काय करायचे?

तन्वीर जमादार, अध्यक्ष, रत्नागिरी ॲम्ब्युलन्स संघटना.

प्राणवायू नसेल तर गंभीर रुग्णाचे काय?

प्राणवायू म्हणजे श्वसनात अडथळा येणाऱ्या व्यक्तीसाठी श्वासोच्छ्‌वास प्रक्रिया तातडीने सुरू करण्यास मदत करणारी कृत्रिम यंत्रणा. सध्या भीतीने प्राणवायूची पातळी कमी होण्याचे प्रमाण कोरोनासह हृदयविकार, रक्तदाब, मधुमेही रुग्णांमघ्ये वाढले आहे. वाढत आहे. अशावेळी खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या अशा रुग्णाला किंवा अधिक उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी नेताना अचानक ऑक्सिजन लागला आणि तो उपलब्ध झाला नाही तर त्या रुग्णाची काय अवस्था होईल, हा विचार जिल्हा प्रशासनाने करायला हवा.

प्राची शिंदे, सामाजिक कार्यकर्ती, रत्नागिरी.

Web Title: रोखOther patients' lives are at stake by blocking oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.