मालवाहतुकीमुळे रापमची एसटी मालामाल; चालक मात्र कंगाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:21+5:302021-05-30T04:25:21+5:30
मेहरुन नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले, तेव्हा आंबा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. ...
मेहरुन नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गतवर्षी कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले, तेव्हा आंबा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. राज्य परिवहन महामंडळाने तत्परता दर्शवीत माल वाहतूक सुरू झाली. जिल्ह्यात आंबापेटीच्या वाहतुकीने माल वाहतुकीला प्रारंभ झाला. मे (२०२०) पासून दि. २० मे (२०२१) पर्यंत ५७ हजार १४७ किलोमीटर वाहतुकीतून दोन कोटी ७३ लाख १९ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मालवाहतुकीमुळे एस.टी.च्या उत्पन्नात भर पडत असली तरी चालकांवर मात्र अन्याय होत आहे.
मालवाहतुकीची गाडी घेऊन जाणाऱ्या चालकाला परत येताना पुन्हा माल घेऊनच यावे लागते. मात्र काहीवेळा भाडे उपलब्ध होत नाही, तोपर्यंत चालकांना अन्य जिल्ह्याच्या आगारात थांबावे लागते. त्यादरम्यान खाण्यापिण्याचा खर्च चालकाला स्वत:च भागवावा लागतो. वास्तविक परजिल्ह्यात जाताना ॲडव्हान्स देणे आवश्यक आहे. मात्र तोही दिला जात नाही. सध्या एस.टी. वाहतुकीवर लाॅकडाऊनचा परिणाम झाला आहे. त्यामुळे चालकांना जबरदस्तीने माल वाहतुकीवर ड्युटी लावली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
वर्षभरात दोन कोटी ७३ लाखाची कमाई
गतवर्षी मे महिन्यापासून मालवाहतूक रत्नागिरी विभागात सुरू झाली. आतापर्यंत दोन कोटी ७३ लाख १९ हजार ५०० रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
अन्य माल वाहतूक करणाऱ्या वाहनांपेक्षा एस.टी.चे मालवाहतुकीचे दर कमी आहेत. विश्वासार्हता जपल्याने वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
कंपन्यांकडून एस.टी.कडे थेट संपर्क साधला जात आहे. वाजवी भाडे, सुरक्षितता यामुळे माल वाहतुकीसाठी एस.टी.ला प्राधान्य दिले जात आहे.
परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत तिथेच मुक्काम
परजिल्ह्यात मालवाहतुकीचा ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकाला परतीसाठी भाडे मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. पाच, सहा दिवस वाट पाहत राहावे लागते. अन्य आगारात राहण्याची सुविधा होत असली तरी जेवण, खाण्याचा खर्च स्वत:लाच करावा लागत आहे.
सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने एस.टी.च्या आगारात निवासाची व्यवस्था होत असली तरी खाण्याचे हाल होतात. जाताना एकवेळचा डबा चालक घेऊन जातात. मात्र हाॅटेल, उपाहारगृहे बंद असल्याने अन्य दिवसात खाण्याचा प्रश्न निर्माण होतो. वाटेतही बंदमुळे चालकांना उपासमार करावी लागते.
ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट
परजिल्ह्यात जाणाऱ्या चालकांना ऐनवेळी महामंडळाकडून खर्चासाठी ॲडव्हान्स रक्कम घेतली जात असली तरी ती पगारातून कट केली जाते.
परतीचे भाडे वेळेवर मिळाले तर ठीक अन्यथा पुढील भाडे मिळेपर्यंत वाट पाहावी लागते. जेवढे दिवस वाढतात, तेवढा खर्चही वाढतो.
ॲडव्हान्सची रक्कम दिली जाते, मात्र पगारातून कट केली जाते. त्याऐवजी चालकांना प्रवासभत्ता देणे आवश्यक आहे.
१८० किलोमीटर प्रवासाचा निकष आहे. त्यापेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास असेल तर दोन चालकांची आवश्यकता आहे.
लांबचा प्रवास असेल तर दोन चालक गरजेचे आहेत. वाटेत चाक पंक्चर झाले किंवा वाहन नादुरुस्त झाले तर अशावेळी सोबत असलेल्या चालकाची मदत होते. त्यामुळे १८० किलोमीटरचा निकष असला तरी पुढच्या प्रवासासाठी डबल चालक देण्याची मागणी होत आहे.
- एक चालक, रत्नागिरी
सध्या एस.टी.वाहतूक फेरीवर परिणाम झाला असला तरी माल वाहतुकीवर चालकांना जबरदस्तीने ड्युटी लावू नये. शिवाय गाडी भरल्याशिवाय येऊ नये ही अट शिथिल करावी. अन्य आगारात थांबावे लागत असल्याने निवासाबरोबर जेवणाचीही सुविधा उपलब्ध करावी.
- एक चालक, रत्नागिरी
लाॅकडाऊन मालवाहतुकीची गाडी घेऊन जाणाऱ्या चालकाना ३०० रुपये प्रवासभत्ता देणे आवश्यक आहे. शिवाय ॲडव्हान्सची रक्कम वेळेवर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. दहा टनापेक्षा अधिक माल भरता कामा नये.
- राजू मयेकर, विभागीय अध्यक्ष, एस.टी. कामगार संघटना.