ओझरेखुर्दत तरूणीला मारहाण करून बलात्कार
By Admin | Published: July 13, 2014 12:21 AM2014-07-13T00:21:19+5:302014-07-13T00:21:31+5:30
तीन महिन्यानंतर झाली सुटका, गुन्हा दाखल
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द येथील एका युवतीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा तीन महिने उपभोग घेण्यात आले. एवढेच नव्हे तर तिला जबर मारहाणही करण्यात आली. ही तरूणी तीन महिन्यांनी घरी आल्यानंतर तिने आपल्यावरील अत्याचाराची कहाणी घरच्यांना सांगितली. याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ मार्च ते २८ जून यादरम्यान झाली.
तालुक्यातील ओझरेखुर्द येथील एका युवतीशी पाटण येथील इम्रान अब्दुल करीम खान (पाटण) या युवकाने मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. तिचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर आपण पळून जाऊ, असे सांगून त्यानं तिला घराबाहेर बोलावून घेतले आणि तिला फूस लावून पळवून नेले.
२८ मार्चला ही घटना घडली होती. त्यानंतर मात्र या युवकाने तिच्या शरिराचा उपभोग घेतला. एवढेच नव्हे तर त्याचे खरे रूप कळल्यानंतर सोडून देण्याची विनंती करणाऱ्या त्या युवतीला त्याने जबर मारहाणही केली. अखेर तिने कशीबशी त्या तरूणाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली.
घरी आल्यानंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने कुटुंबियांना दिली. याप्रकरणी तिने पोलिस स्थानकात आरोपी इम्रान याच्याविरोधात फिर्याद दाखल केली असून त्याच्याविरूध्द भादंवि कलम ३२३, ३७६ व ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी पाच दिवसाच्या पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)