दिवाळी आली तरी रेशन धान्य दुकानात खडखडाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:32 PM2017-10-12T12:32:12+5:302017-10-12T18:06:07+5:30
पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य पडून राहिले असून, जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांमध्ये धान्याचा खडखडाट आहे.
रत्नागिरी , दि. १२ : पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने गोदामात धान्य पडून राहिले असून, जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानांमध्ये धान्याचा खडखडाट आहे. त्यामुळे जनतेला दिवाळीपूर्वी धान्य मिळेल ना, ही चिंता लागून राहिली आहे.
पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदोन्नतीची पदे सरळसेवेतून थेट भरली जावीत तसेच पुरवठा विभागाची स्वतंत्र आस्थापना करावी, हे निर्णय शासनाने रद्द करावेत, या मागणीसाठी पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ सप्टेंबरपासून पुरवठा विभागाचे काम पूर्णपणे थांबविले आहे. त्यामुळे रेशनकार्डचे वितरण, नावे कमी करणे - चढविणे आदी कामांबरोबरच जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये अजून धान्यच आलेले नाही.
३ सप्टेंबरपासून कर्मचाºयांनी पुरवठा विभागाचे काम बंद केले आहे. गोदामात दोन महिन्यांचा धान्यसाठा असला तरी प्रत्येक तालुक्यात धान्याची मागणी करण्यासाठी आवश्यक असणारे चलन अद्याप दुकानदारांनी भरलेले नाही. त्यामुळे त्यांना धान्याची उचल गोदामातून करता येत नाही. गोदामकीपर संपात सहभागी असल्याने विभागाकडून धान्याची वाहतूकही ठप्प झाली आहे.
याचा फटका ग्रामीण जनतेला अधिक बसला आहे. दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. मात्र, अजूनही रेशन दुकानात खडखडाट असल्याने दिवाळी धान्याविना कोरडीच जाणार की काय, अशी चिंता सतावत आहे.
पुरवठा विभागाचे काम बंद होऊन रेशनदुकानदारांना दरदिवशी संप मिटवण्याची प्रतीक्षा करावी लागत आता ९ दिवस झाले. अजूनही संप मिटण्याबाबत कोणतीच हालचाल दिसत नाही. रेशनदुकानदारांना चलन भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते.
गोदामात धान्य असले तरी जिल्ह्यातील ९१५ रेशनदुकानात धान्याचा खडखडाट आहे. ग्रामीण भागातील जनता दरदिवशी दुकानात येऊन धान्य कधी येणार, अशी आतुरतेने विचारणा करीत आहेत. दिवाळीपूर्वी तरी हा संप मिटेल, अशी आशा जनतेला वाटत आहे.
गोदामात धान्य असले तरी सध्या रेशनदुकानात धान्याचा कण नसल्याने ही दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. चलन भरून मागणी नोंदविण्यासाठी दुकानदारांना तहसील कार्यालयात दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. गावातील जनता धान्यासाठी दुकानात हेलपाटे मारत आहेत.
- प्रशांत पाटील,
रेशनदुकानदार, कोळंबे, ता. रत्नागिरी