मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील वेरळ - बोरज रस्ता खड्ड्यातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:10+5:302021-08-25T04:36:10+5:30
खेड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वेरळ-भोस्ते-कोंडीवली-शिव-बोरज या रस्त्यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी खर्चूनही हा रस्ता पुरता खड्ड्यातच गेला आहे. ...
खेड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वेरळ-भोस्ते-कोंडीवली-शिव-बोरज या रस्त्यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी खर्चूनही हा रस्ता पुरता खड्ड्यातच गेला आहे. दिवसागणिक मार्गावरील खड्ड्याचा विस्तार वाढतच चालला आहे. ठेकेदाराकडून केवळ दगड मिश्रित मातीचा मुलामा देऊन खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वेरळ -भोस्ते - कोंडीवली - निळीक - अलसुरे - शिव - बोरज या मार्गासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. यातून खडीकरण, कार्पेट, सिलकोटसह ७८ मोऱ्या, ४ पूल, संरक्षक भिंत, पक्की गटारे या कामांचा समावेश होता. या १४ किलोमीटरचा रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाल्यापासून सातत्याने टीकेची झोड उठविण्यात येत होती. कार्यकारी अधिकारी व उपअभियंता यांच्या ढिसाळ नियोजनामुळे या मार्गाचे काम अर्धवट आहे. याशिवाय वेरळ फाट्यापासून झालेले कामही दर्जाहीन झालेले आहे. या मार्गाच्या कामाबाबत ग्रामस्थ ग्रामपंचायतीने सुरुवातीपासून सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींची दखल न घेता ठेकेदारालाच पाठीशीच घालण्याचे प्रताप करण्यात आले. या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी त्याच निधीत असतानाही त्याकडे कानाडोळा करण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांना मधून संताप व्यक्त होत आहे.
-----------------
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्ता कामाचा दर्जा राखण्यात आलेला नाही. या रस्त्याची दयनीय अवस्थेमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्ता कामाचे उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी.
- अब्दुल रहेमान चौगुले, सरपंच, निळीक ग्रामपंचायत