राज्य वक्तृत्व स्पर्धेत रसिका जोशी प्रथम
By admin | Published: November 30, 2014 09:46 PM2014-11-30T21:46:54+5:302014-12-01T00:18:06+5:30
शिक्षण मंडळ, कऱ्हाडतर्फेयशवंत व्यासपीठ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
चिपळूण : शिक्षण मंडळ, कऱ्हाडतर्फे घेण्यात आलेल्या यशवंत व्यासपीठ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व स्व. शेठ व रा. कि़ लाहोटी कथाकथन स्पर्धेत युनायटेड इंग्लिश स्कूलची रसिका प्रमोद जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला.
कऱ्हाड येथे सोमवार व मंगळवारी या स्पर्धा अतिशय उत्साहात व मोठ्या प्रतिसादात झाल्या. या दोन्ही स्पर्धांचा संयुक्त पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी दुपारी झाला. यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसेवक शंकराप्पा संसुद्दी यांच्या हस्ते रसिकाला प्रमाणपत्र, चषक व रोख रक्कम देऊन टाळ्यांच्या कडकडाटात गौरविण्यात आले. आठवी ते दहावी या गटाच्या वक्तृत्व स्पर्धेत रसिका जोशी हिने ४१ स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक पटकावून कायमस्वरुपी ढाल, चषक व रोख पारितोषिक मिळविले.
रसिकाने निसर्ग एक थोर शिक्षक या विषयावर आपले विचार मांडले. या विषयाची उत्तम मांडणी, अचूक शब्दफेक, सुंदर सादरीकरण, वेळेचे अचूक नियोजन यामुळे परीक्षक भारावले. परीक्षक डॉ. श्रीपाद कुलकर्णी, डॉ. अनुराधा कुलकर्णी व शहा यांनी तिचे विशेष कौतुक केले. या स्पर्धेसाठी तिला युनायटेड इंग्लिश स्कूलचे शिक्षक अजित चव्हाण, मुग्धा बर्वे, रसिकाचे वडील प्रमोद जोशी व आई गद्रे ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. संगीता जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. याआधीही याच ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत सलग ३ वर्षे तिने पारितोषिक पटकावले आहे.
अनेक ठिकाणी वक्तृत्व, कथाकथन व काव्य वाचन स्पर्धेत ती विजयी ठरली आहे. तिच्या यशाबद्दल परशुराम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, युनायटेडचे मुख्याध्यापक कृष्णाजी शिंदे, उपमुख्याध्यापक पाटील, पर्यवेक्षक सपाटे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींसह रसिकाचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)