रत्नागिरीत पारंपरिक मच्छीमारांचे रास्ताराको, जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:24 PM2018-02-16T13:24:46+5:302018-02-16T13:27:01+5:30
राज्य व केंद्र शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून बंदी कालावधीतही सागरी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी सुरू आहे. पर्ससीन मासेमारी कठोर कारवाईद्वारे बंद करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांनी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन केले. पोलिसांनी यावेळी २५० मच्छीमारांना ताब्यात घेतले.
रत्नागिरी : राज्य व केंद्र शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून बंदी कालावधीतही सागरी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी सुरू आहे. पर्ससीन मासेमारी कठोर कारवाईद्वारे बंद करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांनी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन केले. पोलिसांनी यावेळी २५० मच्छीमारांना ताब्यात घेतले.
गुरूवारी दुपारी १२ वाजल्यानंतर दापोली, हर्णै, रत्नागिरी व जिल्ह्याच्या अन्य सागरी भागातील मच्छीमार मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालाच्या प्रवेशद्वारासमोर जमा झाले. मच्छीमारांना मार्गदर्शन केल्यानंतर मच्छीमार प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांची भेट घेऊन त्यांना पर्ससीन विरोधात कायद्याने कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. हे निवेदन हर्णै येथील मच्छीमार महिला पुष्पा पावसे, कलावती पावसे व सीता कालेकर यांच्या हस्ते देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, ५ फेब्रुवारी २०१६च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट याकाळात परवानाधारक पर्ससीन नौकांनाही मासेमारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ३
आॅगस्ट २०१७ च्या केंद्र शासनाच्या आदेशानुसार विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सागरातील एक्सल्युझिव इकॉनॉमिक झोनमध्ये जबाबदार केंद्रीय प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन शाश्वत पध्दतीने मासेमारी करण्यास परवानगी आहे. तर १० नोव्हेंबर २०१७ च्या शासनाच्या आदेशानुसार विशेष आर्थिक क्षेत्रात एलईडी लाईटद्वारे मासेमारी करण्यास तसेच नौकेवर जनरेटर बसवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
तटरक्षक दल व तटवर्ती राज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कायदेशीर कारवाई करावयाची आहे, असेही आदेशात म्हटले आहे. मात्र, या सर्वच आदेशांचे सध्या पर्ससीन मच्छीमारांकडून उल्लंघन होत असून, त्याबाबत पुरावे देऊन, आंदोलन करूनही बेकायदा पर्ससीन मासेमारी थांबलेली नाही. याबाबत संबंधितांची बैठक घेऊन शासन आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगितले जाईल, असे घोरपडे यांनी मच्छीमारांना सांगितले.
या आंदोलनात चंद्रकांत खळे, संतोष नाटेकर, गोपिचंद चोगले, दिनेश कालेकर, पांहुरंग पावसे, सोमनाथ पावसे, हरेश कुलाबकर, कृष्णा दोरकूळकर, वासू कालेकर, बाली खोपटकर, विष्णू पाटील, मकबुल गावकरकर, काशिनाथ कालेकर या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी पोलिसांनी २५० मच्छीमारांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
चोख बंदोबस्त
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष खलील वस्ता व नॅशनल फिशरमन फोरमचे राष्ट्रीय सदस्य रविकिरण तोरसकर यांनी मच्छीमारांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जयस्तंभ सर्कलमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.