निवडणुका दूर, उमेदवार यादीला महापूर; रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चर्चांना ऊत
By मनोज मुळ्ये | Published: April 21, 2023 05:28 PM2023-04-21T17:28:20+5:302023-04-21T17:29:06+5:30
सध्याच्या प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टींपेक्षा सोशल मीडियावरील गावगप्पांनाच अधिक महत्त्व दिले जात आहे.
रत्नागिरी : सध्याच्या प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टींपेक्षा सोशल मीडियावरील गावगप्पांनाच अधिक महत्त्व दिले जात आहे. यातूनच सध्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारीबाबत चर्चा वाढल्या आहेत. निवडणुकांना अजून बराच काळ बाकी असला तरी वेगवेगळ्या उमेदवारांच्या चर्चा मात्र चवीने सुरू आहेत. यातूनच आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, उदय बने आणि बाळ माने अशी संभाव्य नावांची यादी वाढतच चालली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दृष्टीने त्यांचे लक्ष्य मंत्री उदय सामंत हेच आहेत. जे पक्ष सोडून गेले आहेत, अशा आमदारांच्या मतदारसंघावर ठाकरे शिवसेना अधिक बारकाईने लक्ष ठेवणार हे उघड आहे. त्यामुळेच मंत्री सामंत यांच्याविरोधात ठाकरे शिवसेना उमेदवार कोण देणार, याबाबत सातत्याने काही ना काही चर्चा सुरू आहेत. त्यातूनच अनेक नावे पुढे येत आहेत. अर्थात या सर्व अजून फक्त चर्चाच आहेत. ठाकरे शिवसेनेकडून अधिकृत कोणालाही काम सुरू करण्याची सूचना नाही. तसे नियोजन अजून तरी झालेले नाही. त्यामुळे कार्यकर्तेही नेमक्या नावाच्या प्रतीक्षेत आहेत.
आमदार भास्कर जाधव
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना रत्नागिरीत उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अधिक आहे. पक्षाने सांगितल्याने येथून लढू, असे त्यांनी स्वत:ही जाहीर केले आहे. आक्रमक नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रत्नागिरीतून लढण्यासाठी त्यांना विस्कळीत झालेला पक्ष आणि कार्यकर्ते यांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान पेलावे लागेल. त्यासाठी रत्नागिरीशी संपर्कही वाढवावा लागेल.
आमदार राजन साळवी
राजापूरचे आमदार राजन साळवी यांचे नावही चर्चेत आहे. रत्नागिरी हे त्यांचे जन्मगाव आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष म्हणून त्यांनी रत्नागिरीत बराच काळ काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांची स्वत:ची मात्र यासाठी तयारी नाही. २००९, २०१४ आणि २०१९ अशा तीन निवडणुका ते राजापुरातून जिंकले असल्याने त्यांचा भर राजापूर लांजा मतदारसंघावरच आहे.
उदय बने
रत्नागिरी तालुकाप्रमुख म्हणून बरीच वर्षे काम केलेले आणि संघटनेची चांगली माहिती असलेले उदय बने हेच रत्नागिरीचे उमेदवार असतील, असे शिवसेना नेते अनंत गिते यांनी फाटाफूट झाल्यानंतर लगेचच जाहीर केले होते. ते स्वत:ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र फाटाफुटीनंतरच्या पहिल्या सभेनंतर उमेदवार म्हणून त्यांचे नाव फारसे पुढे आलेले नाही.
बाळ माने
माजी आमदार बाळ माने यांचे ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विशेष कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बाळ माने हे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असतील का, असा प्रश्न चर्चेत आहे. मात्र माने यांनी अजून त्याबाबत मौन पाळले आहे. मतदारसंघातील संपर्क वाढवण्याची त्यांची मोहीम पाहता ते रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचेच दिसत आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस चर्चेतही नाहीत
ठाकरे शिवसेनेकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा होत असली तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या चर्चेत कोठेही नाहीत. हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे आणि पुढील निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसना येथे संधी मिळण्याची शक्यता नाही.