चिपळुणात कोरोना रुग्णवाढीचा दर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:55+5:302021-07-21T04:21:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मोठा दणका देणाऱ्या कोरोनोच्या दुसऱ्या लाटेचा वेग काहीसा कमी झाला असून, तूर्तास कोरोना रुग्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मोठा दणका देणाऱ्या कोरोनोच्या दुसऱ्या लाटेचा वेग काहीसा कमी झाला असून, तूर्तास कोरोना रुग्ण वाढीचा दर स्थिर झाला आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य सोयी-सुविधा वाढवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्यापारी, कामगार, ग्राहकांची सरसकट कोरोना चाचणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीवरही नियंत्रण आणण्यास मदत होत आहे.
सध्या तालुक्यात ७५३ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यापैकी १७४ जणांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. आतापर्यंत तालुक्यात १३ हजार ६३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील ११ हजार ८५५ जण बरे झाले आहेत. कोरोनामुळे ४७० जणांचा मृत्यू झाला असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी पाच महिन्यांत अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत तालुक्यातील मृत्युदर ३.६४ टक्के इतका आहे. अजूनही मृत्युदराचा आलेख वाढता असल्याने विविध उपाययोजनांवर प्रशासन व आरोग्य यंत्रणेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी एकूण ४९९ बेड उपलब्ध असून, त्यातील विलगीकरण कक्षात १३५ बेड उपलब्ध आहेत. तसेच आयसीयूचे ५८ बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे याआधी बेड उपलब्ध होण्यावरून निर्माण झालेली ओरड आता कमी झाली आहे. साधारण ५६४ रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. तसेच आरोग्य विभागाने लसीकरणावरही अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत तालुक्यातील १० केंद्राच्या माध्यमातून ७० हजार ८२१ जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
चिपळूण तालुका
एकूण रुग्ण १३,०६३
कोरानामुक्त ११,९५५
मृत्यू ४७०
सक्रिय ७५३
गृहअलगीकरण ५६४
संस्थात्मक अलगीकरण १२८