‘रत्नदुर्ग’च्या कार्यकर्त्यांनी ७० जणांना नेले सुरक्षितस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:36+5:302021-07-27T04:32:36+5:30

रत्नागिरी : चिपळूणमध्ये महापुराचे पंधरा ते वीस फूट पाणी, पावसाचा जोर, विजेच्या तारा, वाहत येणारे लाकडाचे ओंडके यांचा सामना ...

Ratnadurg activists took 70 people to safety | ‘रत्नदुर्ग’च्या कार्यकर्त्यांनी ७० जणांना नेले सुरक्षितस्थळी

‘रत्नदुर्ग’च्या कार्यकर्त्यांनी ७० जणांना नेले सुरक्षितस्थळी

Next

रत्नागिरी : चिपळूणमध्ये महापुराचे पंधरा ते वीस फूट पाणी, पावसाचा जोर, विजेच्या तारा, वाहत येणारे लाकडाचे ओंडके यांचा सामना करत रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सने रेस्क्यू ऑपरेशन केले. पोलिसांच्या सूचनेनुसार खेर्डी येथील एक किलोमीटरच्या परिसरात सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत ७० जणांना सुरक्षितस्थळी नेण्यात यश मिळाले.

रेस्क्यू ऑपरेशन करताना प्रथम एक तीन मजली इमारत निश्चित करून आसपासच्या परिसरातील लहान घरे शोधण्यात आली. तिथे अडकलेल्यांना सुखरूप बोटीतून या इमारतीमध्ये आणले. यामध्ये छोट्या घरांत अडकलेल्या लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि काही रुग्णांना यशस्वी मोठ्या इमारतींमध्ये सुरक्षित नेले. या टीमसाेबत गावखडीतील पुराच्या पाण्यात होडी चालवणारे अनुभवी व पट्टीचे पोहणारे ड्रायव्हरही होते. ही टीम राई, भातगाव, आबलोली मार्गे सायंकाळी ४ वाजता चिपळूणला पोहोचली. सोबत बोट, ट्रक आणि आरटीओची गाडीही होती. रेस्क्यूसाठी एकच फायबर बोट मिळाली. पाण्याच्या खडतर प्रवाहात प्रशिक्षित व पारंगत होडीचालकांमुळे रत्नदुर्गची टीम तग धरू शकली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने मजबूत, दर्जेदार आणि चांगल्या क्षमतेचे इंजिन असणारी बोट दिल्यामुळे या महापुरात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले.

बोट पलटी होऊ नये म्हणून नागरिकांना बोटीत बसवत आणि दोन्ही बाजूंनी पोहत जात. हे प्रशिक्षित स्वयंसेवक वेगवेगळ्या दिशांना पोहत जात जवळच्या घरांमध्ये किती जण अडकले आहेत, याची माहिती घेत व तिथे बोट नेत होते. यामुळे वेळ वाचला. या बचाव कार्यानंतर दोन तास पायी प्रवास करून पोलीस स्थानक गाठले. त्यांच्यासमवेत पोलीस कॉन्स्टेबल अभिजित सकपाळ हेही होते.

----------------------------------

लहान मुलांना प्राधान्य

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रथम लहान मुले, महिला, वृद्धांना प्राधान्य दिले. यामध्ये दीड महिन्याच्या बाळापासून अगदी १०१ वर्षांची आजी आणि काही रुग्णही होते. रत्नदुर्गचे हे काम पाहताना घरात अडकलेल्या काही महिलांनी चहा देतो, असे सांगितले तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. बचावलेल्या काही व्यक्तींनी मानधनही देण्याची तयारी दाखवली.

------------------------------

टीम रत्नदुर्ग

रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स रेस्क्यू टीममध्ये वीरेंद्र वणजू, गणेश चौघुले, गौतम बाष्टे, किशोर सावंत, पराग सुर्वे, सुनील डोंगरे, चिन्मय सुर्वे सहभागी झाले हाेते. त्यांच्या मदतीला गावखडीतील अनुभवी आणि पट्टीचे पोहणारे टीममध्ये निनाद पाटील, जयदीप तोडणकर, अब्बास दरवेश, अयुब दरवेश, फजल पांढरे हेही हाेते.

------------------------------

.. अन् बोट अडकली

पाणी सुमारे पंधरा फुटांच्या वर होते. बोट तीन-चार वेळा अडकली होती. एकदा तिथे ट्रकच्या टपात नंतर एका घराच्या कौलांना लागली व एकदा इमारत बांधकामासाठी लावलेल्या पत्र्यांनाही लागली. दुसऱ्या दिवशी त्याच भागातून जाताना आपली बोट कुठे असेल, याचा अंदाज घेतल्यानंतर आश्चर्य वाटल्याचे रत्नदुर्गच्या सदस्यांनी सांगितले.

Web Title: Ratnadurg activists took 70 people to safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.