रत्नागिरीत ५७३ कॅन्सरचे संशयित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:21 PM2020-03-01T22:21:55+5:302020-03-01T22:21:59+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षभरात असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना विविध आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कॅन्सरच्या आढळलेल्या ५७३ ...
रत्नागिरी : जिल्ह्यात मागील वर्षभरात असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना विविध आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये कॅन्सरच्या आढळलेल्या ५७३ संशयित रुग्णांमध्ये ३३ रुग्णांना कॅन्सर झाले असल्याचे निदानानंतर स्पष्ट झाले आहे़
असंसर्गजन्य आजारांची तपासणी करताना क्षय, मधुमेह, उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, पक्षाघात, हृदयरोग आणि कुष्ठरोग आदिंचा समावेश या सर्वेक्षणामध्ये करण्यात आला होता़ या सर्वेक्षणात घरोघरी फिरून माहिती घेण्यात आली होती. कॅन्सरचा धोका सातत्याने वाढत असताना त्याचे प्राथमिक स्तरावर निदान होणे गरजचे आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वेळीच निदान न झाल्यास हा रोग गंभीर स्वरुप धारण करतो़ यामध्ये महिलांच्या स्तनांचा कॅन्सर तसेच तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. स्तनाच्या कॅन्सरप्रमाणेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर याचीही चाचणी करण्यात आली़
जिल्ह्यात ५७३ लोकांमध्ये कॅन्सरची लक्षणे आढळून आली आहेत़ यातील ३३ रुग्णांना कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामध्ये २५ जणांना तोंडाचा, तर ८ महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. तसेच तंबाखूच्या अतिसेवनामुळे पुरुषांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे.
शहराप्रमाणे ग्रामीण भागात आजही प्रकृतीच्या बदलांना महत्त्व दिले जात नाही़ त्याचा परिणाम म्हणून कॅन्सर असल्याचे उशिरा निदान झाल्यास रूग्ण दगावण्याचीही शक्यता जास्त असते. त्यासाठी असंसर्गजन्य आजाराचे सर्वेक्षण करताना कॅन्सरची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचीही तपासणी करण्यात आली होती़
बदलती परिस्थिती आहार अपायकारक
समाजातील बदलती परिस्थिती, युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता तसेच दिवसेंदिवस बदलत चाललेला आहार अपायकारक ठरत आहे़ तंबाखूच्या अतिसेवनाप्रमाणे अपायकारक शीतपेये घेणे तसेच केमिकल्सचे आहारातील प्रमाणात वाढ ही कॅन्सर होण्यामागे महत्त्वाची कारणे आहेत़