रत्नागिरी : महिलांच्या सहभागाने पाणीपट्टी वसुली १०० टक्के : आंचल गोयल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 04:54 PM2018-09-04T16:54:21+5:302018-09-04T16:57:30+5:30
रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली या ग्रामपंचायतीमधील भारत निर्माणअंतर्गत लक्ष्मीनारायण या वाडीमध्ये राबवलेल्या नळपाणी पुरवठा योजनेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी भेट दिली.
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व योजनांमध्ये महिलांनी सहभाग घेतल्यास आॅटोमेशनचा व समदाबाने पाणी पुरवठा केल्यास योजना उत्तम प्रकारे चालू शकतील व पाणीपट्टी वसुलीही १०० टक्के होऊ शकेल, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली या ग्रामपंचायतीमधील भारत निर्माणअंतर्गत लक्ष्मीनारायण या वाडीमध्ये राबवण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
सन २००८मध्ये भारत निर्माणअंतर्गत लक्ष्मीनारायण या वाडीकरिता नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. योजनेला सद्यस्थितीला १० वर्षे झाली असून ही योजना लोकसहभागाच्या माध्यमातून नियोजनबद्ध चालवण्यात येते. योजनेची पाणीपट्टी १०० टक्के कशा प्रकारे वसूल केली जाते, असे प्रश्न ग्रामस्थांना विचारण्यात आले. त्यावर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी वाडीमध्ये वसुलीसाठी पेटी तयार करण्यात आली आहे.
पेटी दर महिन्याला प्रत्येक कुटुंबाकडे फिरत असून, प्रत्येक महिन्यात त्या कुटुंबाची पाणीपट्टी त्या पेटील जमा केली जाते. सर्व ग्रामस्थ त्या कुटुंबाकडे ठरवण्यात आलेली ४० रुपये पाणीपट्टी लिफाफ्यामध्ये भरुन पेटीत टाकतात. ती पेटी महिन्याच्या १० तारखेला उघडली जाते. जमा झालेली पाणीपट्टी सर्वांकडून प्राप्त झाली आहे.
अगर कसे ते तपासले जाते व ज्यांनी पाणीपट्टी भरली नसेल, त्याच्याकडून दुप्पट म्हणजेच ८० रुपये पाणीपट्टी वसूल केली जाते. तसेच जमा झालेल्या पाणीपट्टीचा ताळमेळ घेऊन आलेले लाईट बिल भरले जाते. उर्वरित रक्कम बँकेत जमा केली जाते, असे यावेळी उपस्थिांनी त्यांना माहिती देताना सांगितले.
आॅटोमेशनमुळे मनुष्यबळाचा वापर नाही
योजना महिलांच्या सहभागातून नियोजनबद्ध राबवली जाते, असे उपस्थित असणाऱ्या महिलांनी सांगितले. तसेच सर्वांना समान दाबाने पाणी पुरवठा केला जातो. ही योजना उत्तम राबवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच यांनी प्रयत्न केले आहेत.
योजना चालू-बंद करण्यासाठी आॅटोमेशनचा वापर करण्यात आल्याने पाणी चालू करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जात नाही. त्यामुळे योजनेवरील खर्च कमी करण्यात आला आहे. त्यामुळे हे काम अधिक सोयीचे झाले आहे. ग्रामस्थांच्या या योजनेमुळे कासारवेली येथे नळपाणी पुरवठा योजना यशस्वीपणे राबविली जात असल्याचे दिसत आहे.