Ratnagiri: सावकारी परवान्यासाठी ५० हजाराची लाच घेणारा जाळ्यात
By शोभना कांबळे | Published: July 11, 2024 03:45 PM2024-07-11T15:45:47+5:302024-07-11T15:46:50+5:30
Ratnagiri News: सावकारी परवान्याचे काम करून देण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक, तालुका रत्नागिरी येथील मुख्य लिपिकाला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सापळा रचून रंगेहात पकडले.
- शोभना कांबळे
रत्नागिरी - सावकारी परवान्याचे काम करून देण्यासाठी ५० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक, तालुका रत्नागिरी येथील मुख्य लिपिकाला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सापळा रचून रंगेहात पकडले. विनायक रामचंद्र भोवड (वय ५७ वर्षे,) असे त्याचे नाव आहे.
आरोपी विनायक भोवड, वर्ग ३ (राहणार - 'स्वामी' त्रिविक्रम नगर, कसोप सडा, ता. जि. रत्नागिरी (वर्ग-3)याने सावकारी लायसन्सचे काम करून देण्यासाठी आपल्याकरिता आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला देण्यासाठी म्हणून तक्रारदाराकडून २६ जून २०२४ रोजी ५० हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार गुरूवार, दि. ११ जुलै रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक रत्नागिरी कार्यालयात आरोपी भोवड याने ५० हजार रूपयांची लाच घेत असता त्याला ताब्यात घेतले. येथील शहर पोलीस ठाण्यात भाेवड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलिस अधीक्षक महेश तरडे, गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा प्रमुख, रत्नागिरी विभागाचे पोलीस निरीक्षक अनंत कांबळे (अतिरिक्त पोलीस उप अधीक्षक, रत्नागिरी) यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. सहायक पोलिस फाैजदार संदीप ओगले, हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, नाईक दिपक आंबेकर, काॅन्स्टेबल हेमंत पवार, राजेश गावकर यांनी हा सापळा यशस्वी केला.
आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथील कार्यालयाकडे संपर्क करावा. किंवा १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.
- अनंत कांबळे (अतिरिक्त पोलीस उप अधीक्षक), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी.