रत्नागिरी : आंब्याची ७५ टक्के आवक घटली, गुढीपाडव्याला शेतकऱ्यांनी केली आंबातोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 04:33 PM2018-03-21T16:33:58+5:302018-03-21T16:33:58+5:30
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आंबातोडीचा मुहूर्त केला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटले असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी आंबा तोडणीचा हा मुहूर्त साधला. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाच हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. मात्र, रविवार असल्याने मार्केटला सुटी होती, त्यामुळे विक्री झालीच नाही. मात्र, सोमवारी दहा हजार पेट्या विक्रीला आल्या.
रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आंबातोडीचा मुहूर्त केला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटले असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी आंबा तोडणीचा हा मुहूर्त साधला.
वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाच हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. मात्र, रविवार असल्याने मार्केटला सुटी होती, त्यामुळे विक्री झालीच नाही. मात्र, सोमवारी दहा हजार पेट्या विक्रीला आल्या. दोन्ही दिवसांच्या मिळून १५ हजार पेट्या विक्रीसाठी आल्या होत्या. गतवर्षी याच दिवशी ६० हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत आंबा उत्पादन यंदा ७५ टक्क्यांनी आवक घटली आहे.
मे महिन्याप्रमाणे उष्म्याच्या झळा मार्चपासून सोसाव्या लागत आहेत. रत्नागिरीत ३३ अंश सेल्सिअस कमाल, तर २६ अंश किमान तापमान असल्यामुळे ह्यफळांचा राजाह्ण तयार होऊ लागला आहे. उष्म्यामुळे काही ठिकाणी आंब्यावर काळे डाग पडत आहेत. त्यामुळे या भाजलेल्या आंब्याला मागणी नाही.
शिवाय कैरीदेखील गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. उष्णतेमुळे आंबा गळून पडण्याचा धोका वाढला आहे. कातळावरील बागांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. कातळ तापत असल्यामुळे आंब्याचा दर्जा घसरण्याचा धोका आहे. त्यामुळे काही शेतकरी झाडांना पाणी देत आहेत.
उष्णतेमुळे आंबा भाजण्याचे, गळ होण्याचे प्रमाण वाढले, त्याचप्रमाणे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. वास्तविक यावर्षी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. गतवर्षी गुढीपाडव्याला ६० हजार पेट्या विक्रीला उपलब्ध होत्या. मात्र, यावर्षी दोन दिवसात १५ हजार पेट्या विक्रीसाठी आल्या.
सध्या १५०० ते ४००० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. यावर्षी आंबा उत्पादनच कमी असल्यामुळे शेतकऱ्यां नी आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणेही अवघड झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर आंबाकाढणी केली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांकडील आंबा हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार होण्याची शक्यता अधिक आहे.
कोकणाबरोबर परराज्यातूनही आंबा तितक्याच प्रमाणात विक्रीला येत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांमधून दररोज आंब्याची आवक होत आहे. हापूस, लालबाग, तोतापुरी, बदामी, गुहा आदी विविध प्रकारचा आंबा विक्रीसाठी येत आहे. मात्र, हा आंबा किलोवर विकण्यात येत असून, हापूस ५० ते १०० रूपये किलो, लालबाग २० ते ३५ रूपये किलो, तोतापुरी २० ते ३० रूपये किलो, गुहा २० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. तर कोकणातील हापूस आंबा डझनावर विकण्यात येत आहे.
शासनाने दलालांची हमाली बंद केल्याने त्याचा परिणाम गतवर्षीपासून आंबा विक्रीवर झाला आहे. वाशी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या आंब्याला फारसा दर मिळत नाही. मात्र, उपनगरांमध्ये होच आंबा अधिक किंमतीने विकण्यात येत आहे. कर्नाटक हापूसची कोकणचा हापूस म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. चौथ्या टप्प्यातील आंबा झाडावर आहे. मात्र, त्याचे प्रमाणही अल्पच आहे. तसेच उष्म्यामुळे तो कितपत टिकेल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
अत्यल्प प्रमाण
यावर्षी ओखी वादळ, अवकाळी पाऊस, पुनर्मोहोर, वाढता उष्मा यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला. बहुतांश शेतकऱ्यांनी आंबा अधिक प्रमाणात नसल्यामुळे आपल्याकडील नेपाळी कामगारांना परत पाठवले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील आंबा तयार होऊन बाजारात येऊ लागला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.