रत्नागिरी : ९९ वर्षांच्या आजीने सूर्यनमस्कार घालून केले अचंबित, कशेळीतील कनकादित्य सूर्यमंदिरात जागतिक विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:48 PM2018-01-17T17:48:18+5:302018-01-17T17:53:19+5:30
कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळंबे (ता. रत्नागिरी) येथील ९९ वर्षांच्या दामले आजींनी सूर्यनमस्कार घालून सर्वांना अचंबित केले.
रत्नागिरी : कशेळी (ता. राजापूर) येथील कनकादित्य सूर्यमंदिरात पुणे येथील चैतन्य योगसाधना आणि कनकादित्य मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोळंबे (ता. रत्नागिरी) येथील ९९ वर्षांच्या दामले आजींनी सूर्यनमस्कार घालून सर्वांना अचंबित केले.
या उपक्रमातून १ लाख ७५ हजार सूर्यनमस्कारांचा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला आहे. २० शाळांतील १८०० विद्यार्थी आणि नागरिकांनी आदित्ययागातून हा पराक्रम केला आहे.
२४ तासांत साखळी पद्धतीने सूर्यमंदिरात १ लाख ५१ हजार सूर्यनमस्कारांचा पराक्रम करण्यात आला. रत्नागिरी शहरातील शाळांसह फणसोप, पावस, पूर्णगड, कशेळी, आडिवरे व राजापूर येथील २० शाळांनी सहभाग घेतला.
आदित्ययागामध्ये सूर्यनमस्कार समंत्र होते. सौरसूक्त पठण- १०८ आहुती, नवग्रह पूजन, अखंड सूर्यनमस्कार, गुणदर्शन कार्यक्रम, ७००० दिव्यांचा दीपोत्सव असे कार्यक्रम रंगले.
सर्व सहभागींना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू देण्यात आली. सूर्यनमस्कार उपक्रमाच्या प्रचार, प्रसारासाठी विश्वनाथ बापट यांनी प्रचंड मेहनत घेतली. शाळांमध्ये जाऊन सूर्यनमस्कार शिकवले.
पटवर्धन हायस्कूलचे संजीवन गुरुकुल, जीजीपीएसचे बाबुराव जोशी गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. कलातीर्थ संगीत विद्यालयार्फे काढलेली सूर्याची रांगोळी लक्षवेधी ठरली. तसेच मंदिरातर्फे कनकादित्याची पालखी काढण्यात आली. सर्वांसाठी तो एक सुखद अनुभव ठरला.
तसेच मंदिराचे विश्वस्त अप्पा ओळकर, डॉ. भागवत तसेच व्यवस्थापक, गुरुकुल प्रमुख किरण जोशी, राजेश आयरे यांचा सत्कार करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी चैतन्य योग साधनेचे संस्थापक श्रीराम साठ्ये, प्रकाश धोकटे, सौरभ कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, अमोल काळे यांनी मेहनत घेतली.
पुणेरी पगडी देऊन सन्मान
सूर्यनारायणामुळे आपल्याला अन्न मिळते, त्याचे स्मरण करून रोज सूर्यनमस्कार घातलेच गेले पाहिजेत, तसे न झाले तर मी त्या दिवशी अन्नग्रहण करीत नाही, हा विचार बापट अनेक वर्षे आचरणात आणत आहेत. याबद्दल त्यांचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला.
आजी घालतात रोज ४० नमस्कार!
कशेळी येथील सूर्यमंदिर सुमारे १ हजार वर्षे जुने आहे. १३ व १४ जानेवारी रोजी सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाच वर्षांच्या मुलांपासून ९९ वर्षांच्या ज्येष्ठांनीही यात नमस्कार घातले. कोळंबे येथील दामले आजी वयाच्या ९९ व्या वर्षी रोज ४० नमस्कार घालतात. आदित्ययागासाठी त्या आवर्जून उपस्थित राहिल्या. रत्नागिरीतील गणपुले यांच्यासमवेत जर्मन पाहुणे रॉगमन हेसुद्धा आवर्जून उपस्थित राहिले.
अविनाश अनपटचे २०१८ नमस्कार
चैतन्य योग साधनाच्या अविनाश अनपट याने पुरुष गटात २०१८ व मुलींच्या गटात अमृता गोरेने १०५८ व महिलांच्या गटात गरुड यांनी ५४१ नमस्कार घातले.