रत्नागिरी : पत्नीच्या अवयवदानातून स्मृती राहणार चिरंतन, शिल्पा रेडीज यांच्या मृत्यूनंतर पतीचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:23 PM2018-04-14T13:23:11+5:302018-04-14T13:29:12+5:30
आपली जवळची व्यक्ती कायमस्वरूपी निघून जाण्याचे दु:ख कधीच मागे सारता येत नाही. पण प्रत्यक्ष पत्नीच्या निधनानंतरही दु:ख बाजुला सारून तिचे अवयव दान केले तर इतर व्यक्तिंचे जीवन प्रकाशमय होईल, अवयवाच्या माध्यमातून पत्नीचेही अस्तित्व राहील, अशा भावनिक हेतूने रत्नागिरीतील अजय रेडीज यांनी पत्नी शिल्पा रेडीज यांचे आपल्या कुटुंबियांच्या सहविचाराने अवयवदान करून समाजाला अवयवदानाचे श्रेष्ठत्व पटवून दिले.
रत्नागिरी : आपली जवळची व्यक्ती कायमस्वरूपी निघून जाण्याचे दु:ख कधीच मागे सारता येत नाही. पण प्रत्यक्ष पत्नीच्या निधनानंतरही दु:ख बाजुला सारून तिचे अवयव दान केले तर इतर व्यक्तिंचे जीवन प्रकाशमय होईल, अवयवाच्या माध्यमातून पत्नीचेही अस्तित्व राहील, अशा भावनिक हेतूने रत्नागिरीतील अजय रेडीज यांनी पत्नी शिल्पा रेडीज यांचे आपल्या कुटुंबियांच्या सहविचाराने अवयवदान करून समाजाला अवयवदानाचे श्रेष्ठत्व पटवून दिले.
अजय रेडीज यांच्या पत्नी शिल्पा (४५ वर्षे) गेली काही वर्षे एका खासगी आस्थापनेत काम करत होत्या. त्या सदैव हसमुख, मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. नेहमीच सहकार्याच्या भावनेने काम करताना त्यांचा जनसंपर्कही चांगला होता.
खेड येथील माहेर असलेल्या शिल्पा रेडीज सासरीही सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना काही वर्षांपूर्वी हृदयाचा त्रास होत होता. मात्र, दीड - दोन वर्षांपूर्वी मुंबईत त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांच्या तब्बेतीची कुठलीच तक्रार नव्हती.
गेल्या आठवड्यात त्यांना अचानक त्रास होऊ लागला. अस्वस्थ वाटू लागल्याने ज्या रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्या मुंबईतील प्रसिद्ध खासगी रूग्णालयात तातडीने हलवावे लागले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
जिच्याबरोबर सोळा - सतरा वर्षांचा संसार केला, ती पत्नीच आपल्याला आणि बारा वर्षाच्या मुलाला सोडून गेल्याने अजय रेडीज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, तेही सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे असल्याने त्यांनी स्वत:ला सावरले. त्यांच्या बहिणी, मेहुणे आदी कुटुंबियांच्या विचाराने पत्नीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिल्पा रेडीज यांचे डोळे, यकृत, मूत्रपिंड दान केल्याने पाच गरजू व्यक्तिंना नवीन जीवन मिळणार आहे.
नवजीवन मिळते
मृत्यूनंतर देह नश्वर ठरतो. मात्र, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयवदान केले तर अनेक गरजू लोकांना त्यांचा लाभ मिळतो, त्यातून नवजीवन मिळते. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तिचे अवयवदान करून अवयवदान श्रेष्ठ दान असल्याचे दाखवून दिले.