रत्नागिरी : शिमगोत्सवानंतर मुंबईला जाणाऱ्या गुरव कुटुंबियांवर काळाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:38 AM2018-03-09T11:38:16+5:302018-03-09T11:38:16+5:30
खेड तालुक्यातील शिवफाटा येथे काल (गुरूवारी) मध्यरात्री १.३० वाजता बोलेरो आणि ईको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सोलगाव (ता. राजापूर) येथील राजेंद्र अनंत गुरव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.
रत्नागिरी : खेड तालुक्यातील शिवफाटा येथे काल (गुरूवारी) मध्यरात्री १.३० वाजता बोलेरो आणि ईको कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सोलगाव (ता. राजापूर) येथील राजेंद्र अनंत गुरव (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात ईको गाडीतील आणखी पाचजण जखमी झाले असून, त्यांना नजीकच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे कुटुंब शिमगोत्सवासाठी आपल्या गावी आले होते. शिमगोत्सव आटोपून हे कुटुंब मुंबईला जात असताना हा अपघात झाला.
या अपघातात सूरज चंद्रकांत गुरव (२२), स्वप्नील चंद्रकांत गुरव (३१), स्वानंदी स्वप्नील गुरव (२५), नयना उर्फ सान्वी सचिन गुरव (२५) आणि प्रेम गुरव (१६) हे जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने चिपळूण आणि डेरवण येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खेडमधील मदत फाऊंडेशनच्या प्रसाद गांधी, बुराण टांके, विवेक बनकर, अमित वनकुटे, सुजित घोडेराय यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली.
अपघातानंतर बोलेरो गाडीच्या चालकाने मात्र घटनास्थळावरून पलायन केले. त्याठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी ही गाडी वापरण्यात येत आहे.
हा अपघाता इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. अपघाताचे वृत्त सोलगाव येथील गावी समजताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली.