रत्नागिरी : कोकण ग्रीन बेल्ट जाहीर करावा, मागणी धरू लागली जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 02:37 PM2018-09-15T14:37:58+5:302018-09-15T14:45:42+5:30
कोकणचा हापूस जीआय मानांकनाच्या प्रतीक्षेत असल्याने कोकण हा ग्रीन बेल्ट झोन जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रत्नागिरी : हवामानात होणाऱ्या बदलामुळे आंबा उत्पादनात दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. बदलामुळे बुरशी, तुडतुडा, थ्रीप्ससारख्या रोगाचा प्रादुर्भाव बळावत असताना त्यासाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक कीटकनाशकांचे अंश फळात उतरतात. त्यामुळे युरोप, अमेरिका, जपान हे देश आंबा नाकारत आहेत. कोकणचा हापूस जीआय मानांकनाच्या प्रतीक्षेत असल्याने कोकण हा ग्रीन बेल्ट झोन जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हंगामापूर्वी आंबा पीक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी संजीवकांचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. त्याचे परिणाम झाडाच्या आयुर्मानावर होत आहेत. शिवाय शासनाने काही रासायनिक कीटकनाशकांवर बंदी आणण्यात आली असली तरी अद्याप त्या कीटकनाशकांची विक्री आणि वापर राजरोसपणे सुरू आहे.
रासायनिक कीटकनाशकांचा सुरूवातीला पंधरा ते वीस दिवस प्रभाव असतो, कालांतराने दुसर्यादा कराव्या लागणार्या फवारणीसाठी वापरल्या जाणार्या कीटकनाशकांचा प्रभाव सहा ते सात दिवस राहतो. कीटकनाशकांचे दर महागडे असल्याने आंबा उत्पादनाच्या खर्चात भरमसाठ वाढत होते.
यावर पर्याय म्हणून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. जीवामृत, गांडूळ खत किंवा अन्य सेंद्रिय खते विविध पिकांसाठी शेतकरी वापरत आहेत. मात्र आंब्यावर जेव्हा हवामानातील बदलामुळे परिणाम होतात, त्यावर रासायनिक कीटकनाशके वापरली जातात. त्याऐवजी सेंद्रिय कीटकनाशकांच्या संशोधनावर भर दिला जाणे गरजेचे आहे.
कोकणातील निसर्गाचा अभ्यास करून सेंद्रिय कीटकनाशकांचा पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे. शासनाने कृषी विद्यापिठाच्या माध्यमातून संशोधन करून आयुर्वेदिक औषधे तयार करणे गरजेचे आहे.
साक्यावर फवारणी रसायन संशोधनाची आवश्यकता
हापूसने जगाच्या पाठीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. परंतु रासायनिक कीटकनाशकांच्या मार्यामुळे आंब्यामध्ये त्याचा प्रभाव राहात असल्याने परदेशातून तो नाकारला जात आहे. हापूस आंब्यात होणार्या साक्यावर आयआयएचआर बंगळुरूचे शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र यांनी आयुर्वेदिक औषध तयार केले आहे.
बाट तयार होण्याच्या स्थितीला आंबा देठासह या औषधाच्या द्रावणात बुडविला तर साका नष्ट होतो. छोट्या झाडांना हा प्रयोग शक्य आहे. मात्र, कोकणातील उंच झाडांसाठी फवारणी हाच उत्तम पर्याय आहे. फवारणी करून साका नष्ट करता येईल, असे संशोधन होणे गरजेचे आहे.
सारंगपूरप्रमाणे कोकण ग्रीन बेल्ट
उत्तरप्रदेशमध्ये सारंगपूर ग्रीन बेल्ट झोन जाहीर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे कोकण ग्रीन बेल्ट झोन जाहीर केल्यास भविष्यात कोकणातील शेतकर्याच्या व्यथा कमी होतील. कोकण कृषी विद्यापीठातच त्याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. शासनाने आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करून शेतकर्याना परवडतील, यासाठी अनुदानावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सेंद्रिय पध्दतीनेच आंबा पिकविला तर त्याला जागतिक स्तरावरून मागणी वाढेल आणि कोकणच्या सर्वसामान्य शेतकर्याचा आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होईल.
समिश्र लागवड
रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा जाहीर झाल्यापासून फळलागवडीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. लागवडीवेळी शेतकर्यानी आंबा, काजू पिकाची लागवड केली. मात्र, मोठ्या प्रमाणावर लागवड करताना एकाच प्रकारच्या झाडांची लागवड केली आहे.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, कीटकांचा प्रभाव रोखण्यासाठी समिश्र लागवडीचे तंत्र जोपासणे गरजेचे आहे. अनेक प्रयोगशील शेतकरी आंबा बागेतून आंतरपिक उत्पादन घेत आहेत. त्यासाठी कृषी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील शेतकर्याना वेळोवळी मार्गदर्शनही करण्यात येत आहे.
शासकीय योजना, त्यांची अंमलबजावणी करण्यात जिल्ह्याचा कृषी विभाग अग्रेसर आहे. त्यामुळेच शेतीखालील क्षेत्र वाढत आहे. उत्पादित माल, उत्पादनावरील परिणाम यामुळे शेतकर्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याचीही आवश्यकता आहे.
निर्णयाची गरज
कोकण ग्रीन बेल्ट झोन जाहीर करून सेंद्रीय औषधांचे तत्काळ संशोधन करणे गरजेचे आहे. सेंद्रीय पध्दतीने कोकणात पिकवलेल्या आंब्याला जागतिकस्तरावरून नक्कीच मागणी वाढेल, शिवाय येथील शेतकरी सधन होण्यासाठी मदत होईल. कोकणचा हापूस व येथील शेतकरी यांचा अभ्यास करून शेतकर्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याचीही आवश्यकता आहे. याबाबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
- सलील दामले,
शेतकरी, कोळंबे