रत्नागिरीत सेना-आघाडीची ‘मोहर’
By admin | Published: December 26, 2014 10:42 PM2014-12-26T22:42:35+5:302014-12-26T23:44:17+5:30
पालिका विषय समिती : नगराध्यक्ष मयेकर पडले एकाकी
रत्नागिरी : येथील नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदांवर आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सेना-शहर विकास आघाडीने आपली मोहर उमटवली. सर्व सहा सभापतीपदे काबिज करीत सेनेने पालिकेच्या कारभारात यापुढे आपला वरचष्मा राहील हेच सिध्द केले आहे. यामुळे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे एकाकी पडले असून, पालिकेत अध्यक्ष भाजपाचे व सभापती सेनेचे असे विरोधाभास निर्माण करणारे चित्र निर्माण झाले आहे.
सेना व आघाडीकडेच सर्व विषय समित्यांची सभापतीपदे राहतील, यासाठी सेना व शहर विकास आघाडीची गुरुवारी रात्री गुप्त बैठक झाली होती. त्यावेळीच समिती सभापतीपदांचे वाटप निश्चित करण्यात आले होते. याबाबत आज ‘लोकमत’ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले. दोन समिती सभापतीपदे शहर विकास आघाडीला देण्यात आली आहेत, तर आघाडीचे प्रमुख दत्तात्रय तथा बाळू साळवी यांची स्थायी समितीवर निवड झाली आहे. तसेच भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर व सेनेचे प्रदीप तथा बंड्या साळवी यांचीही स्थायी समितीवर निवड झाली. पदसिध्द अध्यक्ष नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सहा समिती सभापती व नव्याने निवड झालेले ३ सदस्य यामुळे स्थायी समिती सदस्यांची संख्या १० झाली आहे.
आज (शुक्रवार) झालेल्या निवडणूक प्रक्रियेच्यावेळी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उपनगराध्यक्ष संजय साळवी, सेनेचे पक्षप्रतोद प्रदीप साळवी, राष्ट्रवादीचे प्रतोद सुदेश मयेकर, शहर विकास आघाडीचे प्रमुख दत्तात्रय तथा बाळू साळवी यांच्यासह सर्व २८ नगरसेवक उपस्थित होते. निवडणुकीचे अर्ज प्रभारी मुख्याधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी स्विकारले, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी काम पाहिले.
आजच्या विषय समिती निवडणुकीत शिवसेनेकडे चार, तर शहर विकास आघाडीकडे २ सभापतीपदे आली आहेत. निवड झालेले विषय समिती सभापती व सदस्य याप्रमाणे : सार्वजनिक बांधकाम समिती सभापती - योगेश पंडित, सदस्य - रामेश्वरी धुळप, सुनील डाफळे, विनय मलुष्टे, प्रज्ञा भिडे, सुप्रिया रसाळ, सईद पावसकर, दत्तात्रय साळवी.
शिक्षण समिती : सभापती - शिल्पा सुर्वे (सेना) सदस्य - रामेश्वरी धुळप, विनय मलुष्टे, मधुकर घोसाळे, संपदा तळेकर, पल्लवी पाटील, सुदेश मयेकर, मुनीज जमादार. आरोग्य समिती : सभापती उपनगराध्यक्ष संजय साळवी (सेना), सदस्य - उज्ज्वला शेट्ये, मिलिंद कीर, नुरुद्दिन पटेल, सुनील डाफळे, सुप्रिया रसाळ, राजश्री शिवलकर, सईद मजगावकर, मुनीज जमादार. पाणीपुरवठा समिती : सभापती - स्मितल पावसकर (शहर विकास आघाडी), सदस्य - विनय मलुष्टे, मिलिंद कीर, मधुकर घोसाळे, सुनील डाफळे, दीपा आगाशे, संपदा तळेकर, सईद पावसकर.
नियोजन समिती : सभापती - प्रीती सुर्वे (शहर विकास आघाडी), मधुकर घोसाळे, प्रदीप तथा बंड्या साळवी, नुरूद्दिन पटेल, मिलिंद कीर, प्रज्ञा भिडे, पल्लवी पाटील, प्रीती सुर्वे, मुनज्जा वस्ता.
महिला व बालकल्याण समिती-सभापती रशिदा गोदड (सेना), उपसभापती मुनीज जमादार, सदस्य-रामेश्वरी धुळप, नुरुद्दिन पटेल, उज्ज्वला शेट्ये, दीपा आगाशे, राजश्री शिवलकर, मुनज्जा वस्ता. (प्रतिनिधी)