रत्नागिरीतील अवलिया ! विंटेज मोटारबाइक अन् जुन्या वस्तूंचा खजिनाच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 11:44 AM2018-02-18T11:44:21+5:302018-02-18T11:44:52+5:30
आपले आजोबा, पणजोबा किंवा त्यांच्याही आधीच्या काळात वापरल्या गेलेल्या वस्तूंची क्रेझ खूप लोकांना असते. बदलत्या काळात खूप जुन्या गोष्टी आपल्याला पाहायलाही मिळत नाहीत. पण अशा गोष्टी जतन करून त्या लख्ख ठेवणारा एक अवलिया रत्नागिरीत आहे आणि त्यांनी एक-दोन नाही तर जुन्या काळाची साक्ष देणाऱ्या सुमारे ९० ते १०० गोष्टी जमा केल्या आहेत.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : आपले आजोबा, पणजोबा किंवा त्यांच्याही आधीच्या काळात वापरल्या गेलेल्या वस्तूंची क्रेझ खूप लोकांना असते. बदलत्या काळात खूप जुन्या गोष्टी आपल्याला पाहायलाही मिळत नाहीत. पण अशा गोष्टी जतन करून त्या लख्ख ठेवणारा एक अवलिया रत्नागिरीत आहे आणि त्यांनी एक-दोन नाही तर जुन्या काळाची साक्ष देणाऱ्या सुमारे ९० ते १०० गोष्टी जमा केल्या आहेत. या अवलियाचे नाव आहे ईश्वर मुकुंद आगाशे. रत्नागिरीला एक व्यावसायिक, मसाला व्यापारी म्हणून परिचित असलेल्या आगाशे यांच्या घरात जुन्या काळातील असंख्य गोष्टींचा संग्रह असून, जुन्या मोटारसायकल हे त्यातील मोठे आकर्षण आहे. तब्बल १२ जुन्या गाड्या आगाशे यांच्या ताफ्यामध्ये असून, या सर्वच्या सर्व गाड्या त्यांनी उत्तम स्थितीत ठेवल्या आहेत.
काहीतरी करण्याचे वेड असणारीच माणसे खूप काही करू शकतात. ईश्वर आगाशे यांनाही असंच वेड आहे. आधुनिक काळात दुर्लक्षित होत चाललेल्या जुन्या गोष्टींचा संग्रह करणं हा त्यांचा छंद. हा छंद फक्त छोट्या-छोट्या वस्तूंपुरता मर्यादीत न ठेवता, त्यांनी मोटारसायकलबाबतही जपल्याने १९५० सालची ‘मॅचलेस’ मोटारसायकलही त्यांच्या ताफ्यामध्ये आहे.
आपल्या या छंदाबाबत ईश्वर आगाशे भरभरून बोलतात. आपल्यापेक्षा भरपूर वस्तूंचा संग्रह असणारे लोक आहेत, माझ्याकडे अजून खूप कमी संग्रह आहे, असे ते आवर्जून सांगत असले तरी त्यांच्या पोतडीतल्या अनेक गोष्टी मनाला आनंद देणाºया आहेत. ज्या गोष्टी आता फक्त चित्रातच पाहायला मिळू शकतील, अशा गोष्टी त्यांनी जपल्या आहेत. मूळ प्रतिमेला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने त्यांची डागडुजीही ते करतात.
जुन्या मोटारबाईक्स फक्त शो म्हणून सोबत ठेवायच्या नाहीत तर त्या चालूस्थितीत हव्यात. त्यामुळे दर रविवारी आणि अन्य सुट्टीच्या दिवशी आपण या गाड्यांची आवर्जून देखभाल करत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आणखी काही वर्षांनी त्यांच्याकडे असलेला संग्रह खूप मोठा असेल आणि त्याचे महत्त्वही वाढेल. अशा वस्तू आता वापरातूनच नाही तर लोकांच्या स्मृतींमधूनही बाद झाल्या आहेत.
१२ विंटेज मोटारसायकल-
मोटारबाईक्सचे वेड असंख्य लोकांना असते. वेगाने जाणारी गाडी तसेच आसपासच्या साºयांच्या नजरा वेधून घेतील असे गाडीचे फायरींग हे तरूणाईला वेड लावते. अलिकडे चित्रपटातही वेगवेगळ्या मोटारबाईक्स तरूणांना आकर्षित करून घेतात. ईश्वर मुकुंद आगाशेही त्याला अपवाद नाहीत. गाड्या हा त्यांचा विकपार्इंक. गेली दहा वर्षे त्यांनी अशा गाड्या शोधून त्या मिळवल्या आहेत. त्यांच्याकडे १९५० सालातील ‘मॅचलेस’ ही लंडनमधील मोटारबाईक आहे. ५०० सीसी क्षमतेच्या या मोटारबाईकचे वजन ३५० किलो आहे. आगाशे यांनी दिल्लीमध्ये ही गाडी घेतली. लंडनमध्ये आज ही गाडी आठ लाखांना विकली जाते. दुर्दैवाने या गाड्यांच्या दुरूस्तीबाबत अनेकांना माहिती नसते. त्यांनी या गाडीची आवश्यक ती डागडुजी कोल्हापूर येथे करून घेतली. आज आगाशे यांच्या ताफ्यामध्ये फ्लॉवरहेड प्रकारचे इंजिन असलेली १९६७ सालची ‘जावा’ गाडी आहे. १९७४ची ‘येझदी’, १९६७ सालची ‘व्हेस्पा’ आहे. शस्त्र पुरवठा करणाºया ‘बीएसए’ या कंपनीची १९५४ सालची मोटारबाईकही आगाशे यांनी जपली आहे. याखेरीज ‘लुना, लॅब्रेडा’ या गाड्याही त्यांनी चकाचक ठेवल्या आहेत.
भिंतीवरची परदेशी घड्याळे-
लोलक असलेली घड्याळे ही बाब आजच्या काळात नाविन्याची नाही. पण आताच्या काळातील सर्वच घड्याळे ही सेलवर चालणारी आहेत. ईश्वर आगाशे यांनी किल्ली द्यावयाची परदेशी बनावटीची दहा घड्याळे आपल्या संग्रहात ठेवली आहेत. त्यात जर्मन, अमेरिका आणि जपान येथील घड्याळांचा प्राधान्याने समावेश आहे. त्यांच्याकडे तीन किल्ल्यांचेही एक घड्याळ असून, सध्या त्याची स्प्रिंग निकामी झाली आहे. अशी घड्याळे आता कुठे मिळतच नसल्याने दुरूस्तही होत नाहीत. त्यांचे पार्टही मिळत नाहीत. त्यामुळे या स्प्रिंगसाठी त्यांची खूप धावाधाव झाली होती. रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे त्यांची निराशा झाली. आता कोलकाता येथून त्यांनी ती स्प्रिंग मागवली आहे. वस्तू जवळ ठेवायची तर ती चालूस्थितीत हवी, यासाठी त्यांचा भर आहे आणि त्यासाठीच हे घड्याळ सुरू करण्याची त्यांची धडपड आहे. दर तासाला चिमणी बाहेर येऊन ओरडते असे किल्लीवरचे घड्याळही त्यांच्याकडे आहे. त्याच्या किल्ल्या म्हणजे दोन लांब चेनच आहेत. दर दोन दिवसांनी किल्ली दिली की ही घड्याळे विनातक्रार सुरू राहतात, असे त्यांनी सांगितले.
सैनिकांचा स्टोव्ह-
आपला संग्रह दाखवताना आगाशे यांनी एक छोटेखानी डबा काढला. वरून कसलाच अंदाज न येणारा हा डबा उघडल्यानंतर लक्षात येते की त्यात बर्नर आणि त्याला जोडलेली एक छोटीशी टाकी असलेला तो स्टोव्ह आहे. आतमध्येच स्पिरीटची एक छोटी बाटलीही आहे. सैन्यातील लोकांचे बिऱ्हाड पाठीवर असते. त्यांना वाहून नेण्यासाठी सहज, सोपा असा हा ‘मेड इन स्वीडन’ स्टोव्ह असल्याचे आगाशे यांनी सांगितले. स्पिरीटच्या आधारे तो पेटवला जातो. आगाशे यांनी रत्नागिरीतील सगळी दुकाने पालथी घालून याचा वायसर शोधला आणि हा स्टोव्ह सुरू केला आहे.
ग्रामोफोन अजूनही खणखणीतच-
आज सीडीच्या जमान्यात ग्रामोफोन हा काय प्रकार आहे, असा प्रश्न विचारला जाण्यासारखी स्थिती आहे. पण जुन्या काळातील रेडिओला जोडलेला ग्रामोफोन आगाशे यांनी जपला आहे आणि मुख्य म्हणजे तो चालूस्थितीत आहे. १९३० पासूनच्या गाण्यांच्या तबकड्याही त्यांनी मिळवल्या आहेत. हा ठेवा आहे आणि आपण तो कायम जपून ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
२५ कि. मी. क्षमतेची समुद्री दुर्बीण-
आगाशे यांच्या पोतडीत १९१५ सालातील एक दुर्बीण आहे. एक भिंगवाली ही समुद्री दुर्बीण जवळजवळ दोन फूट लांब करता येते. त्यातून २५ किलोमीटर अंतरापर्यंत पाहता येऊ शकते. ही दुर्बीण आपल्याला पुण्यामध्ये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. व्हिक्टोरियन मरीन टेलिस्कोपर असा सिम्बॉलही त्यावर आहे.
जादूची पोतडीच-
पूर्वीच्या काळी घोडेस्वार दोरीच्या सहाय्याने बाळगत असलेली मातीची वॉटरबॅग, पूर्ण चंदनापासून बनवलेला १९५० सालातील कृष्णार्जुनाचा रथ, जुन्या काळात रेल्वे स्थानकावर गाड्यांना दाखवला जाणारा कंदील, जुन्या काळातील वातीचे दिवे, देवपूजेतील घंटा अशा असंख्य वस्तू त्यांच्या संग्रहात आहेत.