रत्नागिरीच्या आविष्कार संस्थेच्या शिक्षकांचा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी

By शोभना कांबळे | Published: June 17, 2023 07:04 PM2023-06-17T19:04:57+5:302023-06-17T19:05:10+5:30

रत्नागिरी तालुक्यातील १२ शाळानंतर आता राज्यातील बाैद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी राबविणार

Ratnagiri Aviskar Sanstha teachers project as a pilot for the state | रत्नागिरीच्या आविष्कार संस्थेच्या शिक्षकांचा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी

रत्नागिरीच्या आविष्कार संस्थेच्या शिक्षकांचा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरीतील आविष्कार संस्थेच्या साै. सविता कामत विद्यामंदिरच्या शिक्षकांनी आपल्या शाळेतील विशेष मुलांसाठी तयार केलेला ‘स्वयंसेतू प्रालेख प्रमाणीकरण प्रकल्प’ राज्यातील केवळ विशेष मुलांसाठीच नसून तो राज्यातील बाैद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरणारा आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील १२ शाळांमध्ये पथदर्शक प्रकल्प म्हणून यशस्वीरित्या राबविल्यानंतर तो आता राज्यभर ११ स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.

राज्यभरातील बाैद्धिक अक्षम असलेल्या मुलांच्या शाळेत आतापर्यंत कुठलाच असा ठराविक अभ्यासक्रम नाही. त्यामुळे प्रत्येक शाळा आपला अभ्यासक्रम स्वतंत्र ठरवत असते. मात्र, सविता कामत विद्यामंदिर या शाळेच्या विशेष शिक्षिका लीना गुढे, मानसी कांबळे यांनी केवळ आपल्याच शाळेतील मुलांसाठी नव्हे तर जिल्ह्यातील सामान्य शाळांमधील बाैद्धिक अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, अशा दृष्टीने मुख्याध्यापिक वैशाली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष काैशल्याधारित ‘स्वयंसेतू प्रालेख प्रमाणीकरण प्रकल्प’ तयार केला. हा प्रकल्प त्यांनी संस्थेसमोर मांडला. हा प्रकल्प केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्यातील बाैद्धिक अक्षम मुलांसाठीच उपयुक्त असल्याचे  या संस्थेचे सदस्य आणि रत्नागिरीतील शिक्षणतज्ज्ञ तसेच मानसशास्त्रज्ञ सचिन सारोळकर यांच्या लक्षात आले. त्यामुळे या संस्थेने त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आणि नगरपरिषदेच्या १२ शाळांच्या २३ विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प राबविला. यात २२ शिक्षकांचा सहभाग होता. आविष्कार संस्थेचे लीना गुढे, मानसी कांबळे, नितिन चव्हाण आणि बाबासाहेब कांबळे या चार शिक्षकांनी या शाळांमध्ये जाऊन या शिक्षकांना या प्रकल्पाविषयी सांगितले. या शिक्षकांच्या सकारात्मक सहकार्यातून हा पथदर्शी प्रकल्प चार महिने राबविण्यात आला. त्यानंतर या प्रकल्पाच्या मुल्यांकनातून समाेर आलेल्या निष्कर्षाच्या आधारे हा प्रकल्प यशस्वी झाल्याचे दिसून आले. या प्रकल्पाला डाएटचे अधिव्याख्याता डाॅ. संदीप पवार यांचे मार्गदर्शन आणि प्राचार्य सुशील शिवलकर यांची प्रेरणा मिळाली.

रत्नागिरी तालुक्यातील १२ शाळांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता राज्यातील ११ स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने महाराष्ट्र आणि गोवा   राज्यांत सामान्य शाळांमधील बाैद्धिक अक्षम मुलांसाठी राबविला जाणार आहे.



‘स्वयंसेतू प्रालेख प्रमाणीकरण प्रकल्प’ हा आविष्कार संस्थेच्या मुलांसाठी या शिक्षकांनी तयार केला असला तरी राज्यातील सर्वच बाैद्धिक अक्षम मुलांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. - सचिन सारोळकर, शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, रत्नागिरी

Web Title: Ratnagiri Aviskar Sanstha teachers project as a pilot for the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.