रत्नागिरी : त्या बॅगेत आढळून आले धातूचे पान, श्वान पथक, एटीएस पथकाला केले पाचारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:33 PM2018-11-16T12:33:07+5:302018-11-16T12:34:57+5:30
कोकण रेल्वे मार्गावरुन गोव्याकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये आढळलेल्या निळ्या रंगाच्या बॅगेत धातूचे पान असल्याचे आढळून आले आहे.
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरुन गोव्याकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये आढळलेल्या निळ्या रंगाच्या बॅगेत धातूचे पान असल्याचे आढळून आले आहे.
कुर्ला टर्मिनस (मुंबई) येथून सकाळी ११.४० वाजता सुटणाऱ्यां नेत्रावती एक्स्प्रेसमध्ये एक अनोळखी बॅग असल्याची माहिती आरपीएफच्या जवानांना देण्यात आली. चिपळूण रेल्वे स्थानकावर सायंकाळी ६.३० वाजता गाडी थांबल्यानंतर आरपीएफच्या जवानांनी ती बॅग ताब्यात घेतली.
सुरुवातीला या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशी व चिपळूण स्थानकावर असलेल्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. बॅगेत संशयास्पद वस्तू असल्याची शक्यता आहे असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर प्रवाशी शांत झाले.
या दरम्यान रेल्वेमध्ये ही बॅग नक्की कोणी ठेवली याचा शोध सुरु झाला. त्यासाठी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी ते गोवापर्यंत नाकाबंदी करण्यात आली. नेत्रावती एक्सप्रेसमधून वालोपे रेल्वे स्टेशन आवारात ही बॅग ठेवली. त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.शितल जानवे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व इतर कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
सकाळी १० नंतर रत्नागिरी बॉम्ब शोध व नाश पथक, एटीएस (दहशतवादी विरोधी पथक), श्वान पथक, घरडा केमिकल संशोधन केंद्राचे पथक दाखल झाले. या निळ्या बॅगमध्ये नेमकी कोणती संशयास्पद वस्तू आहे याचा शोध घेण्यास सुरुवात झाली.
सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विविध पथकांद्वारे तपास सुरु होता. मात्र या बॅगमध्ये सिल्व्हर कोटिन असलेल्या काचेच्या पेटीत अँटी पिस (धातूचे पान) आढळून आले. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.