रत्नागिरी बालमहोत्सवात छोट्यांबरोबरच मोठ्यांनीही घेतला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:38 PM2017-11-14T14:38:06+5:302017-11-14T14:52:31+5:30
टीव्ही, मोबाईल, कार्टूनच्या दुनियेत रमणाऱ्या बालकांना यापासून काही काळ दूर ठेवण्यासाठी तसेच झिंगाटसारख्या गीतांचा प्रभाव असणाऱ्या बच्चे कंपनीला बालगीतांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बालदिनाचे औचित्य साधून येथील लर्निंग पॉर्इंटच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या बालमहोत्सवाने छोट्यांबरोबरच मोठ्यांनाही नाचविले.
रत्नागिरी : टीव्ही, मोबाईल, कार्टूनच्या दुनियेत रमणाऱ्या बालकांना यापासून काही काळ दूर ठेवण्यासाठी तसेच झिंगाटसारख्या गीतांचा प्रभाव असणाऱ्या बच्चे कंपनीला बालगीतांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बालदिनाचे औचित्य साधून येथील लर्निंग पॉर्इंटच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या बालमहोत्सवाने छोट्यांबरोबरच मोठ्यांनाही नाचविले.
लर्निंग पॉर्इंटच्या पुढाकाराने लायन्स क्लब तसेच रोटरी क्लब आदी विविध संस्थांच्या पुढाकाराने बालदिनानिमित्त बालमहोत्सवाचे आयोजन रविवारी सायंकाळी शहरातील सावरकर नाट्यगृहात केले होते. रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य धरमसीभाई चौहान, मरीनर दिलीप भाटकर, दीप्ती भाटकर, उपनगराध्यक्ष स्मितल पावसकर, नगरसेविका दिशा साळवी, डॉ. उमा बिडीकर, डॉ. गिरीश बिडीकर, ओंकार फडके, सुहास ठाकुरदेसाई, संगीतकार विजय रानडे, पोतदार स्कूलच्या मुख्याध्यापिका अस्मिता चोप्रा तसेच लर्निंग पॉर्इंटचे प्रमुख सचिन सारोळकर, सुखदा सारोळकर, मँगो इव्हेंटच्या अभिजीत गोडबोले आदींच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या प्रेक्षागारात फुगे सोडून आविष्कार संस्थेतील कुणाल तोडणकर याने ओंकार स्वरूपा हे गीत सादर करून सर्वांची वाहवा मिळवली.
या बालमहोत्सवात निवडक बालदोस्तांनी सुरेख बालगीते ऐकवली. यावर बालदोस्तांनी नृत्यही सादर केले. यात बालवाडीपासून सातवीपर्यंतचे ३१ गायक कलाकार सहभागी झाले होते.
शुभंकरोती, गोरी गोरी पान, दिवसभर पावसात, टप टप टप, सर्कशीत गेला ससा, लकडी की काठी, ससा तो ससा, शेपटीवाल्या प्राण्यांची, नाच रे मोरा या बालगीतांनी बच्चे कंपनीसह पालकांनाही नाचायला लावले. सिद्धी केळकर हिने कार्टून्सची मीमिक्री केली.
डोरेमॉन, मिकी माऊस यासह अनेक कार्टून्सचे हुबेहूब आवाज काढले. प्रश्नोत्तरांमध्ये बालदोस्तांनी बक्षिसेही जिंकली. यात सहभागी झालेल्या बालवाडी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्याला भेटवस्तू देण्यात आल्याने बालदिनाचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता. लर्निंग पॉर्इंटच्या सचिन सारोळकर, सुखदा सारोळकर, संगीत शिक्षक विजय रानडे आणि मँगो इव्हेंट्सचे अभिजित गोडबोले यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले
होते.
मूकबधीर विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक अरुण फाटक, प्रसिद्ध चित्रकार नीलेश शीळकर आदी कलाकारांनी ओरिगामी, चित्रकला, टॅटू पेंटिंग, मेंदी शिकवल्या. बालदोस्तांसाठी आवडीची अनेक पुस्तके नाट्यगृहात उपलब्ध होती. त्यामुळे या स्टॉलवर बच्चे कंपनीची भरपूर गर्दी पाहायला मिळाली.
रत्नागिरीतील सर्व शाळांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमात लर्निंग पॉर्इंटच्या अॅक्टिव्हिटी क्लबची मुले कार्यक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून काम पाहताना येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेकडे लक्ष देत होती.
बाल दिनाचा आनंद मुलांबरोबर घेणे, हा वेगळा अनुभव पालकांना मिळाला. त्यामुळे आम्हीही लहान झालो, कायम स्मरणात राहील, असा हा कार्यक्रम वारंवार व्हावा, अशा अनेक प्रशंसनीय प्रतिक्रिया या कार्यक्रमामुळे भारावलेल्या पालकांनी तसेच इतर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दिल्या.