रत्नागिरी ‘एज्युकेशन हब’ म्हणून विकसित होईल : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:21 AM2021-06-29T04:21:30+5:302021-06-29T04:21:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रमध्ये एज्युकेशनल हब असेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रमध्ये एज्युकेशनल हब असेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. मराठा मंदिर हायस्कूल, पाली येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, परशुराम कदम, संस्थेचे अध्यक्ष बने, मुख्याध्यापिका रावराणे उपस्थित होत्या. मंत्री सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, कवी कालिदास संस्कृत विद्यालय उपकेंद्र, विभागीय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थानिक उपकेंद्र, शासकीय लाॅ कॉलेज असे शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आले असून, ते लवकरच पूर्ण होतील, असे सांगितले.
सामंत म्हणाले की, या शाळेमध्ये आपले शिक्षण झाले असून, याठिकाणी लागेल ती मदत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत तसेच आपण डिजिटलपुरते मर्यादित न राहता सॅटेलाईट केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, त्यासाठी लागेल ती मदत आपण करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
रत्नागिरीला मोठा समुद्रकिनारा लाभला असून, पर्यटन क्षेत्रात अधिक विकास करण्यासाठी वाव आहे. त्यामुळे येथील मुलांना तांत्रिक ज्ञान देणारे शिक्षण देणेही गरजेचे आहे, असे सामंत म्हणाले.
त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लोवले (ता. संगमेश्वर) येथे ग्राम विलगीकरण केंद्राला भेट दिली व पाहणी केली.