सेंद्रिय शेतीचे सर्वात चांगले मॉडेल रत्नागिरीत
By admin | Published: May 27, 2016 10:35 PM2016-05-27T22:35:48+5:302016-05-27T23:25:02+5:30
आरीफ शहा : कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
रत्नागिरी : केंद्र शासनाने सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार भारतातील सर्वांत चांगले मॉडेल रत्नागिरीत तयार करण्यात येणार आहे. येथील शेतकऱ्यांना कमीत कमी पाण्यात अधिकतम पिके घेण्याबरोबर पिकाची उत्पादकता वाढवण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पन्नास एकर शेतीचे गट तयार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण २८ गट तयार करून त्यांना सेंद्रीय पध्दतीने शेती करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय खते तयार करणे, कीटकनाशके, पिकांचे लागवडीपासून उत्पादनापर्यंत वेळोवेळी रेकॉर्ड ठेवणे, याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
भात, नागली, मसाला पिके तसेच नगदी पिकांमध्ये आंबा, काजू व भाजीपाला लागवडीची माहिती देऊन शेतकऱ्यांना संबंधित माल विकल्यावर बाजारभावापेक्षा अधिक पैसे मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय खते, कीटकनाशकेवगळता रासायनिक खते, कीटकनाशके वापरता येणार नाहीत.
राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातून प्रत्येकी ५ मिळून एकूण १५ गट तयार करण्यात आले आहेत. एका बचत गटासाठी तीन वर्षात एकूण १५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. गांडूळ खत तयार करणे, मालाची ने-आण करण्यासाठी आवश्यक वाहन घेण्यासाठी अनुदानही देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय बचतगट योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)