रत्नागिरी : मनोरूग्णालयात रूग्णांचे वाढदिवस उत्साहात, चेहऱ्यावर उमटले हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:15 PM2018-09-12T14:15:31+5:302018-09-12T14:21:00+5:30
आपुलकी सामाजिक संस्था आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मनोरूग्णालयात ज्यांचे नातेवाईक नाहीत, अशा ५२ रुग्णांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
रत्नागिरी : मनोरूग्णालयात केक कापून ५२ रुग्णांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी रूग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटल्याचे दिसत होते.
आपुलकी सामाजिक संस्था आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मनोरूग्णालयात ज्यांचे नातेवाईक नाहीत, अशा ५२ रुग्णांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश आनंद सामंत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, मनोरूणालय अधीक्षक डॉ. विलास भैलुमे, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, आपुलकी सामाजिक संस्थेचे सौरभ मलुष्टे, डॉ. अविनाश ढगे, पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष हेमंत वणजु, तालुकाध्यक्ष राजेश शेळके आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मनोरुग्णालयाच्या कामकाजाबाबत कौतुकही केले. मनोरूग्णांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक असला पाहिजे, तरच रुग्णांमध्ये चांगले परिवर्तन होईल, या रुग्णांना प्रेमाची गरज आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन सुनील चव्हाण यांनी केले.
मनोरुग्णांच्या विकासासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडूनही राबविण्यात येत आहेत. मात्र, यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश असला पाहिजे, असे प्रतिपादन न्यायाधीश आनंद सामंत यांनी केले.
सामाजिक बांधिलकीतून आपुलकी व पत्रकारांकडून मनोरुग्णांचा वाढदिवस साजरा केला जाणे, ही बाब उल्लेखनीय असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.
डॉ. विलास भैलुमे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन पत्रकार जान्हवी पाटील यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते नितीन शिवदे यांनी आभार मानले.