रत्नागिरी भाजपला हवंय नारायणास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 06:13 PM2020-12-04T18:13:50+5:302020-12-04T18:15:50+5:30
shivsena, Narayan Rane, politics, bjp, ratnagirinews शिवसेनेला शह देण्यासाठी आणि शिवसेनेतील अस्वस्थ लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाची आस धरली आहे. राणे यांनी केलेल्या रत्नागिरी दौऱ्यामुळे आणि राणे यांनीही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : शिवसेनेला शह देण्यासाठी आणि शिवसेनेतील अस्वस्थ लोकांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाची आस धरली आहे. राणे यांनी केलेल्या रत्नागिरी दौऱ्यामुळे आणि राणे यांनीही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही वर्षात शिवसेनेने रत्नागिरी जिल्ह्यावर आपला एकछत्री अंमल कायम ठेवला आहे. इतर कोणत्याही पक्षाला मर्यादेपेक्षा अधिक यश मिळालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने काही प्रमाणात हातपाय पसरले आहेत, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ शिवसेनेचेच प्राबल्य आहे. जोवर भाजप आणि शिवसेनेची युती होती, तोवर भाजपला कुठे ना कुठे यश मिळत होते. मात्र, ही युती तुटल्यानंतर भाजपलाही मर्यादीतच यश मिळत आहे.
सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्याची तयारी केली जात आहे. त्यातही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ताकद जिल्ह्यात खूप कमी आहे. त्यामुळे भाजपच्यादृष्टीने सर्वात मोठी लढाई शिवसेनेसोबत आहे. म्हणूनच शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपला आक्रमक नेतृत्त्वाची गरज आहे.
ही गरज माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेच पूर्ण करू शकत असल्याने त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते करत आहेत. पुढील वर्षी काही नगर परिषदा आणि नगर पंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसेनेला रोखण्यासाठी राणे यांनी आतापासूनच पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्ते करत आहेत.
शिवसेनेत नाराजी
गेल्या काही काळात शिवसेनेत बरीच अस्वस्थता पसरली आहे. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना पुढे केले जात आहे. महत्त्वाच्या विषयांमध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांना विचारातच घेतले जात नाही. त्यामुळे रत्नागिरी शहरातील अनेक पदाधिकारीही पक्षातील निर्णयांमुळे अस्वस्थ आहेत. त्यामुळे नाराजीचे प्रमाण वाढत आहे. ही नाराजी भाजपच्या फायद्याची ठरावी, नाराजांनी भाजपमध्ये यावे, यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठीच राणे यांच्या नेतृत्त्वाची अपेक्षा भाजप कार्यकर्ते करत आहेत.
राणे यांचीही तयारी
नारायण राणे यांनी नुकताच रत्नागिरीचा दौरा केला. या दौऱ्याप्रसंगी भाजप कार्यकर्त्यांमध्ये खूपच उत्साहाचे वातावरण होते. राणे यांनी आता रत्नागिरीकडे विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा यावेळी मांडण्यात आली. त्याला राणे यांनीही संमत्ती दर्शवली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या विषयात विशेष लक्ष घातले आहे. रत्नागिरीतील पाणी योजनेसाठी झालेल्या जागा खरेदीचा विषय आपण तडीस नेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.