रत्नागिरी : स्वखर्चाने त्यांनी बांधले बंधारे, पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 02:23 PM2018-03-30T14:23:35+5:302018-03-30T14:23:35+5:30
शासन जेवढी रक्कम या योजनांसाठी वापरते, त्याच्या व्याजाइतकीही रक्कम न वापरता बांधलेल्या बंधाऱ्यांत पाणी साचते व ते तीन ते चार महिने अधिक पुरते हा प्रयोग गेले पाच ते सहा वर्ष दहिवली येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष विकास घाग यांनी यशस्वी करुन दाखवला आहे.
सुभाष कदम
चिपळूण : शासन जेवढी रक्कम या योजनांसाठी वापरते, त्याच्या व्याजाइतकीही रक्कम न वापरता बांधलेल्या बंधाऱ्यांत पाणी साचते व ते तीन ते चार महिने अधिक पुरते हा प्रयोग गेले पाच ते सहा वर्ष दहिवली येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष विकास घाग यांनी यशस्वी करुन दाखवला आहे.
पाणी अडवा, पाणी जिरवा असा नारा देत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी शासन कोट्यवधी रुपयांची योजना करते. परंतु, नियोजनाचा अभाव आणि अनास्था यामुळे या योजना फोल ठरतात. आजही शासन पाणी अडवण्यासाठी ग्रामीण भागात लोकसहभागातून तर काही ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधारे बांधते. हजारो रुपये खर्च करुन बांधलेल्या बंधाऱ्यात दिवाळीनंतर थेंबभर पाणीही नसते.
कोकणातील भौगोलिक स्थिती ही डोंगराळ, दऱ्यांखोऱ्यांची व रेताड मातीची आहे. पाणी धरुन ठेवण्याची क्षमता येथील जमिनीत नसल्याने जमिनीवर सांडलेले पाणी वाया जातो. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होते. लोकसहभागातून दरवर्षी विजय बंधारे किंवा कच्चे बंधारे मोठ्या प्रमाणावर बांधले जातात. परंतु, योग्य नियोजन नसल्यामुळे तेथे फारसे पाणी थांबत नाही.
शासन जेवढी रक्कम या योजनांसाठी वापरते, त्याच्या व्याजाइतकीही रक्कम न वापरता बांधलेल्या बंधाऱ्यांत पाणी साचते व ते तीन ते चार महिने अधिक पुरते हा प्रयोग गेले पाच ते सहा वर्ष दहिवली येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष विकास घाग यांनी यशस्वी करुन दाखवला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घाग यांनी आपला जीवनप्रवास सुरु केला. प्रारंभीच्या काळात अनेक खस्ता खाल्ल्या. त्याचे चांगले, वाईट परिणाम त्यांना भोगावे लागले. यातूनच त्यांना जीवनाचा मार्ग मिळाला आणि ठेकेदारी व्यवसायात त्यांनी आपले पाय मजबूत केले. आज परिस्थितीवर मात करुन ते एक यशस्वी ठेकेदार म्हणून नावारुपाला आले. परंतु, पैसे आले म्हणून ज्या समाजात आपण वावरतो, त्या समाजाशी बांधिलकी जपताना त्यांनी समाजाला मदत करण्याचे काम सुरुच ठेवले आहे.
यातूनच आपल्या भागातील पाणीप्रश्न सुटावा म्हणून त्यांनी ६५ ते ७० हजार रुपये खर्च करुन मातीचे ८ फूट उंच व ९ फूट रुंदीचे प्लास्टिक कागद लावून बंधारे बांधले. घाग हे पाण्यासाठी बंधारे बांधतातच. परंतु, डोंगरभागात फिरणाऱ्या पशुपक्ष्यांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी जेथे नैसर्गिक स्रोत उपलब्ध असतील, तेथे ते लहान -लहान डुरी खोदतात. त्यामुळे जंगली प्राण्यांची सोय होते व हे प्राणी मानवी वस्तीकडे फिरकत नाहीत.
आयुष्यात आपण जे कमवले ते सर्वांचे आहे. या समाजाला आपण काही दिले पाहिजे यासाठी गेले पाच ते सहा वर्ष अभ्यासपूर्वक घाग व त्यांचे भाऊ महेश घाग हे आपल्या कुटुंबासह झपाटून हे काम करत आहेत. त्यांचे हे काम आता मूर्त स्वरुपात आले असून त्याचे दूरगामी चांगले परिणामही दिसू लागले आहेत.
खरंतर शासनाने रोलमॉडेल म्हणून त्यांच्या कामाकडे पाहायला हवे. २०११पासून घाग बंधू अव्यहतपणे प्रसिद्धीपासून दूर राहून हे काम करीत आहेत. यावर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, सभापती पूजा निकम, उपसभापती शरद शिगवण, प्रभारी सरपंच रुपेश घाग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदींनी प्रत्यक्ष या कामाची पाहणी करुन घाग यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
जिल्ह्यातील अन्य उद्योजक, व्यावसायिकांनी विकास घाग यांचा आदर्श घेत आपापल्या भागात असे काम उभे केल्यास कोकणचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी इच्छाशक्ती आणि श्रम करण्याची ताकद हवी. माणसाने मनात आणले तर तो काहीही करु शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे घाग यांचे दिसायला खूप छोटे पण परिणामकारक फार मोठे असे काम आहे. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतानाच त्यांना सलाम!
आमदारांच्या हस्ते गौरव
गेले तीन महिने या बंधाऱ्यात पाणी आहे. आजही या बंधाऱ्यांत ४० टक्केपेक्षा जास्त पाणी असून, अजून महिना, दीड महिना हे पाणी पुरेल, असा विश्वास घाग यांना आहे. चिपळूण पंचायत समितीच्या कृषी विभागाने घाग यांचा हा प्रयोग पाहिला आणि पंचायत समितीच्या आमसभेत त्यांचा आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तेव्हापासून घाग यांचे काम जनतेसमोर आले.