रत्नागिरी : सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला, वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:39 PM2018-08-03T16:39:21+5:302018-08-03T16:42:06+5:30
कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
देवरूख : कोसुंब- तुळसणी मार्गावरील सांगवे येथे सप्तलिंगी नदीवरील पुलाचा खांब ढासळला आहे. हा पूल कोणत्याही क्षणी कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक बंद असल्यामुळे सांगवे, तुळसणी, फणसट गावातील शेकडो विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेत बांधकाम विभागाने पुलाची डागडुजी तातडीने करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील सांगवे, तुळसणी, फणसट हा ग्रामीण भाग आहे. या तीन गावांचा तालुक्याशी संपर्क राहावा, वाहतुकीसाठी सोयीचा मार्ग व्हावा, यासाठी सांगवे येथील सप्तलिंगी नदीवर पूल होणे गरजेचे होते. येथीलच सामाजिक कार्यकर्ते मेजर सीताराम लक्ष्मण शेलार यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी पूल मंजूर झाला होता.
पुलाचे बांधकाम होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला आहे. या मार्गावरून सध्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने हा पूल धोकादायक बनला होता. गतवर्षी पावसाळ्यात पुलाच्या डाव्या बाजूचा भराव वाहून गेल्याने त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. परिणामी काही दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली होती.
या पुलाच्या डागडुजीसाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी १० लाख रूपये मंजूर केले होते. या निधीतून पुलाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, संपूर्ण पुलाची डागडुजी करणे अथवा पूल नव्याने बांधणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामस्थांनी संबंधीत विभागाकडे वारंवार पत्रव्यवहाराबरोबरच पाठपुरावा केला. मात्र, बांधकाम विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे.
याचाच फटका पुन्हा सोमवारपासून सांगवेवासियांना बसत आहे. पुलाचा पिलर खालील बाजूने ढासळला आहे. ही बाब काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली आणि एकच खळबळ उडाली. या मार्गावरून अवजड वाहनांचीही ये- जा सुरू असते. कोणताही अनर्थ घडू नये, याकरिता खबरदारी म्हणून पुलावरून होणारी वाहतूक सोमवारपासूनच बंद ठेवण्यात आली आहे.
या परिसरातील विद्यार्थी शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी देवरूख येथे येतात. मात्र बसफेऱ्या या सांगवे मुस्लीम मोहल्ल्यापर्यंत सुरू आहेत. परिणामी सांगवेसह तुळसणी, फणसट येथील विद्यार्थी, ग्रामस्थांना ७ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
ग्रामस्थांनी मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला पुलाच्या बांधकामाबाबत पत्र दिले आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने या ठिकाणाहून वाहन जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. या पुलाचे काम ढासळत असताना लोकप्रतिनिधींनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.