रत्नागिरी : नेत्रावतीमध्ये ब्राऊन शुगरसदृश पावडर, यंत्रणेकडून कसून तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:30 AM2018-11-15T11:30:41+5:302018-11-15T11:35:50+5:30
कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसमध्ये ब्राऊन शुगर हा मादक पदार्थ नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस व बेलापूर नियंत्रण कक्षाने तपासाची चक्रे जोरात फिरवली.
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसमध्ये ब्राऊन शुगर हा मादक पदार्थ नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस व बेलापूर नियंत्रण कक्षाने तपासाची चक्रे जोरात फिरवली.
चिपळुण स्थानकात या गाडीची बुधवारी सायंकाळी कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी गाडीच्या एका बोगीत एक सुटकेस बेवारस आढळून आली. त्यामध्ये ब्राऊन शुगरसदृश पावडर असलेले एक पाकीट आढळले असून रेल्वे पोलीस व चिपळुण पोलीस याची कसून तपासणी करीत आहेत.
दक्षिणेकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसमधून ब्राऊन शुगर वाहून नेत असल्याची गुप्त माहिती त्रिवेंद्रम सुरक्षा कक्षाने दिली होती. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दल व बेलापूर नियंत्रण कक्षाने तपासाची चक्रे वेगात फिरवली.
नेत्रावती एक्सप्रेस चिपळुण रेल्वे स्थानकात आली असता आधीपासूनच सज्ज असलेल्या रेल्वे पोलीस व पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केली. त्यामध्ये एक सुटकेस बेवारस स्थितीत आढळून आली. त्यामध्ये ही ब्राऊन शुगर सदृश पावडर आढळून आली. मात्र ही ब्राऊन शुगरच आहे की अन्य काही याबाबत खातरजमा करणे बाकी आहे.
नेत्रावती गाडीची रत्नागिरी स्थानकातही पुन्हा तपासणी करण्यात आली. पोलीस तपासाच्या हालचालींमुळे संशयित पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र एका संशयिताला ताब्यात घेतल्याचीही चर्चा आहे.याप्रकरणाची कसून चौकशी होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.