रत्नागिरी, चिपी विमानतळांना उद्या सुरेश प्रभू यांची भेट, विमानसेवा लवकर सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 06:18 PM2018-03-31T18:18:17+5:302018-03-31T18:18:17+5:30
कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत.
रत्नागिरी : कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेनंतर सुरू होणारी विमानसेवा कोकणच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवणार आहे.
सुरेश प्रभू हे १ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोकण विकासासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनतर्फे अंबर हॉल, रत्नागिरी येथे आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
यानंतर ते हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील व कुडाळ येथे ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशन आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर गेली २० वर्षे रखडलेल्या चिपी विमानतळाची ते पाहणी करणार आहेत.
यावेळी ते अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहेत. हवाईमंत्री असल्याने विमानतळ सुरू करण्याचा मार्ग ते सोपा करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रत्नागिरी विमानतळ हे तटरक्षक दलाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर या विमानतळाच्या विस्ताराचे काम वेगात सुरू होते. येथील धावपट्टीची लांबीही वाढवण्यात आली असून, येथून प्रथम तटरक्षक दलाची विमान वाहतूक सुरू होईल व मे २०१८मध्ये प्रवासी विमान वाहतूक सुरू होणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.
सिंधुदुगार्तील चिपी विमानतळाकरिता आतापर्यंत अनेक मुहूर्त जाहीर झाले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येत्या जूनमध्ये विमान टेक आॅफ करेल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, अधिवेशन काळात आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर देताना या विमानतळाचे उदघाटन नेमके कधी होईल, याबाबत ठोस आश्वासन दिलेले नाही. मात्र, या दौऱ्यामुळे ही विमानतळे लवकरच सुरू होतील, अशी आशा आहे.
राऊंड टेबल कॉन्फरन्स रत्नागिरीत
कोकण विकासाच्या दृष्टीने कृषी, मत्स्य, पर्यटन व वाहतूक या क्षेत्रातील विविध संधी तसेच नव्याने होणाऱ्या प्रकल्पांना गती देण्याकरिता केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली देशातील एपेडा, एमपेडा, भारतीय कृषी संस्था तसेच केंद्रीय पर्यटन बोर्ड, औद्योगिक विकास संस्था, रबर बोर्ड, स्पाईस बोर्ड, काजू निर्यात बोर्ड, आरोग्य प्राधिकरण, लेदर इंडस्ट्रीज, जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीज, टेक्सटाईल्स इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग, नाबार्ड, शिपिंग पोर्ट आणि अनेक राष्ट्रीय बँकांचे प्रतिनिधी यांच्या प्रमुखांची राऊंड टेबल कॉन्फरन्स मंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत होत आहे.
कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी येथील तरुणांना कोकणातच नोकरी, व्यवसाय उपलब्ध करण्यासाठी ही कॉन्फरन्स महत्त्वाची ठरणार आहे.