Ratnagiri: चिपळूणमध्ये मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' पहिल्याच दिवशी रुसली!
By संदीप बांद्रे | Published: July 1, 2024 07:46 PM2024-07-01T19:46:37+5:302024-07-01T19:46:58+5:30
Ratnagiri News: राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयात महिला व कुटुंब प्रमुखांची गर्दी झाली होती.
- संदीप बांद्रे
चिपळूण - राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयात महिला व कुटुंब प्रमुखांची गर्दी झाली होती. मात्र शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयात तलाठी भाऊसाहेबच न आल्याने दुपारपासून सायंकाळी उशीरापर्यंत अनेकांना भाऊंची प्रतिक्षा करावी लागली. या प्रकारामुळे पहिल्याच दिवशी लाकडी बहीण रुसली, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केल्यानंतर महिलांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरमहिना दिड हजार रूपये अर्थसहाय्य केले जाणार असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. १ ते १५ जूलै या कालावधीत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे. मात्र या प्रस्तावात वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तसेच अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधारकार्ड , रेशनकार्ड, बँक पासबुक व फोटो सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार वार्षिक उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सोमवारी पहिल्या दिवसापासूनच विविध ठिकाणच्या तलाठी कार्यालयात गर्दी झाली. चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयातही महिलांसह कुटुंबातील सदस्यांनी उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी गर्दी केली होती. परंतू येथील तलाठी भाऊसाहेबांकडे चिपळूणसह कामथे गावचा अतिरीक्त कार्यभार असल्याने ते चिपळूण तलाठी कार्यालयात उशीरापर्यंत आले नाहीत. त्यामुळे दुपारपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अनेक नागरिक कार्यालया बाहेर भर पावसात ताटकळत उभे होते. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता भाऊसाहेब येताहेत एवढेच सांगितले जात होते. अखेर काहीजण कंटाळून परत गेले. परंतू काही महिला व अन्य नागरिक कार्यालया बाहेरच सायंकाळी उशीरापर्यंत भाऊसाहेबांची वाट पहात उभे होते.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी तहसीलदार प्रविण लोकरे यांच्याशी संपर्क साधला. चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयावर बहुतांशी नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे या कार्यालयातील तलाठ्यांना अतिरीक्त कार्यभार दिल्याने शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय नियमीत होत आहे. तेव्हा या कार्यालयात पुर्णवेळ तलाठी मिळण्याची मागणी तहसीलदारांकडे केली. त्यामुळे आता तहसीलदार लोकरे हे याविषयी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.