रत्नागिरी : चिपळूण नगरपरिषदेकडून स्वच्छता मोहीम, गटारे व नाल्यांची केली स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:43 PM2018-07-02T16:43:53+5:302018-07-02T16:45:40+5:30
चिपळूण शहर परिसरातील गटारे व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, यावेळी काढलेला गाळ रस्त्याकडेलाच ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ उचलण्यात आला आहे. तसेच शीवनदीच्या किनाऱ्यावर टाकलेली सडलेली भाजी व कचराही पालिकेने उचलला आहे.
चिपळूण : शहर परिसरातील गटारे व नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, यावेळी काढलेला गाळ रस्त्याकडेलाच ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा गाळ उचलण्यात आला आहे. तसेच शीवनदीच्या किनाऱ्यावर टाकलेली सडलेली भाजी व कचराही पालिकेने उचलला आहे. ही स्वच्छता मोहीम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
पावसाळा सुरु होण्यापूर्वीच चिपळूण नगर परिषदेने शहरातील गटारे व नाल्यांची स्वच्छता केली होती. मात्र, त्यामधून काढण्यात आलेला गाळ रस्त्याकडेलाच टाकून ठेवण्यात आला होता. या गाळावर झाडी वाढली होती. साईडपट्टीवरच गाळ असल्यामुळे पादचाऱ्यांना जाता-येता दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.
मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी तातडीने याठिकाणी स्वच्छता करण्याच्या सूचना पालिका आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी शहरातील रस्त्याच्याकडेला टाकण्यात आलेला हा गाळ व कचरा उचलण्यासाठी जेसीबी व डंपर आणण्यात आला होता.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, चिंचनाका ते बहादूरशेख, गोवळकोट रोड या भागात रस्त्याच्याकडेला टाकण्यात आलेला गाळ यावेळी उचलण्यात आला. यावेळी रस्त्याच्या बाजूने वाढलेली झाडी तोडण्याच्या सूचनाही मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.