रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय रूपडे बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:08 PM2019-06-04T13:08:57+5:302019-06-04T13:18:38+5:30
रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या परिसरात वाहन पार्किंगची व्यवस्था मार्गी लागली असून, आता दोन्ही बाजूंनी विविध झाडे लावून सुशोभिकरणासाठी बांधकाम केले जात आहे.
रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मोकळ्या परिसरात वाहन पार्किंगची व्यवस्था मार्गी लागली असून, आता दोन्ही बाजूंनी विविध झाडे लावून सुशोभिकरणासाठी बांधकाम केले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात २०१३ साली दोन प्रशासकीय इमारती बांधण्यात आल्या आहेत. यापैकी एका इमारतीत जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, सभागृह तसेच जिल्हाधिकारी यांच्या प्रशासनातील विविध विभाग स्थलांतरीत करण्यात आले आहेत. तर नजिकच्या दुसऱ्या नव्या इमारतीत तहसील कार्यालय तसेच अन्य शासकीय कार्यालये हस्तांतरित करण्यात आली आहेत. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी यांचे कार्यालय तसेच कोषागार कार्यालय आणि अन्य कार्यालये कार्यरत आहेत.
गतवर्षांपासून या परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरातील इतर शासकीय कार्यालये यामध्ये कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुर्वी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारी वाहनांची गर्दी आता थांबली असून, या कार्यालयासमोरील परिसर मोकळा झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक कार्यालयांच्या जुन्या इमारती होत्या. त्यापैकी काही कार्यालये दुसरीकडे हलविण्यात आली असून, या इमारतींचे गतवर्षांपासून निर्लेखन करण्यात आले आहे. त्यामुळे आता हा परिसर अधिकच मोकळा झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय प्रशस्त व्हावे, यादृष्टीने मोकळ्या करण्यात आलेल्या जागेचे सपाटीकरण करण्यात येत असून, प्रवेशद्वारापासून झाडे लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने सध्या बांधकाम सुरू करण्यात आले असून, यावर्षी झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मोकळा परिसर विविध झाडांनी सुशोभित झालेला दिसणार आहे.