रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या इमारतींचे निर्लेखन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:06 PM2018-03-06T15:06:22+5:302018-03-06T15:23:33+5:30
जुन्या इमारतींमुळे झाकोळलेला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आता मोकळा होणार आहे. या परिसरातील दहा जुन्या इमारतींचे निर्लेखन करण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरूवात झाली असून, सुरूवात पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या निर्लेखनाने झाली आहे. मात्र, या जुन्या कार्यालयांतील कागदपत्रे कुठे हलवावीत, अशी चिंता या कार्यालयांना सतावत आहे.
रत्नागिरी : जुन्या इमारतींमुळे झाकोळलेला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आता मोकळा होणार आहे. या परिसरातील दहा जुन्या इमारतींचे निर्लेखन करण्यास जिल्हा प्रशासनाकडून सुरूवात झाली असून, सुरूवात पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या निर्लेखनाने झाली आहे. मात्र, या जुन्या कार्यालयांतील कागदपत्रे कुठे हलवावीत, अशी चिंता या कार्यालयांना सतावत आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ब्रिटीश काळात बांधलेली आहे. त्याचबरोबर इतर कार्यालयांच्या इमारतीही आता जीर्ण झाल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे तसेच उपविभागीय कार्यालयाचे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे ही इमारत सध्या चांगल्या स्थितीत आहे. मात्र, इतर इमारती मोडकळीस आल्याने धोकादायक झाल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूला २०१३ साली जिल्हाधिकारी तसेच इतर विभाग व अन्य कार्यालयांसाठी दोन नव्या प्रशासकीय इमारती उभारण्यात आल्या आहेत. सध्या जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच इतर विभाग यांची कार्यालये नव्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली असून, दुसऱ्या नव्या इमारतीतही काही कार्यालये हलविण्यात आली आहेत. जुन्या इमारतीत अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासह, जिल्हा खनिकर्म, जिल्हा कोषागार कार्यालय आदी कार्यालये नेण्यात आली आहेत.
जुने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नव्या दोन प्रशासकीय इमारतींमधील विविध कार्यालयांत कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे जिल्हाधिकारी यांच्या या दोन्ही इमारतींना वाहन पार्किंगची समस्या सतावत आहे. त्यातच समोर असलेल्या या इमारती जीर्ण झाल्याने त्या निर्लेखित करणे गरजेचे आहे. त्यामुळे या कार्यालयांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
यापैकी या आवारातील पंचायत समितीच्या जुन्या इमारतीचे निर्लेखन करून हे कार्यालय जिल्हा परिषद भवन येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यानंतर आता जिल्हा भूमी अभिलख कार्यालय निर्लेखिकरणाला प्रारंभ झाला आहे. तहसील कार्यालयही नव्या प्रशासकीय इमारतीत हलवण्यात आले आहे.
या कार्यालयाचा केवळ पुरवठा विभाग तसेच निवडणूक विभाग अजून थोडे दिवस या इमारतीत राहणार आहे. या दोन इमारतींसह रेकॉर्ड रूम, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालय, नगर भूमापन कार्यालय, प्रांत कार्यालय, आदींच्या इमारती हटवून हा परिसर मोकळा करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यालयांना तशा नोटीस जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.
निर्लेखनाची कार्यालये
पंचायत समिती, तहसील कार्यालय, हुजूर अभिलेख, दुय्यम उपनिबंधक कार्यालय, अक्षीक्षक, जिल्हा भूमी अभिलेख, उपअधीक्षक, जिल्हा भूमी अभिलेख, नगर भूमापन कार्यालय, अभिलेख कक्ष, वाहनतळ (गॅरेज), जिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हा पुरवठा विभाग (जुने कार्यालय).