रत्नागिरी : प्लास्टिकबंदी आॅक्टोबरपासून तीव्र होणार, प्रशासनाची आक्रमक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:34 PM2018-09-19T13:34:52+5:302018-09-19T13:37:57+5:30
पर्यावरणमंत्री रामदास कदम काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यांवर आले असता त्यांनी आॅक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी अधिक कडक करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून व्यापारीवर्गाला या पिशव्यांचा वापर थांबवावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.
रत्नागिरी : पर्यावरणमंत्री रामदास कदम काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यांवर आले असता त्यांनी आॅक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी अधिक कडक करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून व्यापारीवर्गाला या पिशव्यांचा वापर थांबवावा लागणार आहे, अन्यथा त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.
केंद्रीय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी लागू करण्यात आली. तसं पाहिलं तर ही बंदी ३१ मार्चनंतर लागू करण्यात आली होती. मात्र, ही बंदी थोडी शिथील झाल्याने २३ जूनपासून बंदी कडक करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले.
त्यानुसार तत्कालिन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. मात्र, आतापर्यंत सर्वच वापरासाठी अत्यावश्यक असणारी प्लास्टिक पिशवी बंद झाल्याने सर्वत्र गोंधळ सुरू झाला.
प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याने अनेक दुकानांवर छापे टाकून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या होत्या. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील काही कापड विक्रेत्यांच्या दुकानावर नगरपरिषदेने छापा मारून कित्येक टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या होत्या. एवढेच नव्हे; तर या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे पाऊलही उचलले.
यानंतर व्यापाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे आमदार उदय सामंत यांच्याकडे मांडले व आणखी मुदत वाढवून मिळण्याची विनंती केली. त्यानुसार सामंत यांनी पर्यावरणमंत्री यांच्याशी संभाषण केले. सप्टेंबरअखेर मुदत मिळाली. मात्र, आता सप्टेंबर संपत आल्याने आॅक्टोबरपासून पुन्हा ही मोहीम तीव्र होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.