रत्नागिरी : फासकीतून पळालेल्या बिबट्याचा करूण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:40 AM2018-12-17T11:40:47+5:302018-12-17T11:41:31+5:30
चिपळूण तालुक्यातील गाणेखडपोली येथे फासकीत अडकलेल्या आणि त्यानंतर फासकीतून स्वत:ची सुटका करून पाच ग्रामस्थांना जखमी करून पळून गेलेल्या बिबट्याचा अखेर करूण अंत झाला आहे. या बिबट्याचा मृतदेह रविवारी सायंकाळी उशिरा गाणे गावातील नदीकिनारी एका झुडूपात आढळून आला.
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील गाणेखडपोली येथे फासकीत अडकलेल्या आणि त्यानंतर फासकीतून स्वत:ची सुटका करून पाच ग्रामस्थांना जखमी करून पळून गेलेल्या बिबट्याचा अखेर करूण अंत झाला आहे. या बिबट्याचा मृतदेह रविवारी सायंकाळी उशिरा गाणे गावातील नदीकिनारी एका झुडूपात आढळून आला.
खडपोली येथील एमआयडीसीमधील साफयीस्ट कंपनीच्या मागील बाजूस जंगली भागात डुक्कर पकडण्यासाठी फासकी लावण्यात आली होती. त्या फासकीत आज मंगळवारी सकाळी बिबट्या अडकला होता. त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी गेलेल्या लोकांवर त्याने फासकीतून सुटून हल्ला केला. त्यामध्ये पाचजण जखमी झाले होते. त्यानंतर त्या बिबट्याचा गेले तीन दिवस शोध सुरु होता. मात्र तो सापडला नव्हता.
बुधवारी सकाळी ७ वाजता ते दुपारी २ वाजेपर्यंत गोरेगाव येथून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बचाव पथकाचे डॉ. शैलेश पेठे व चिपळूण वन विभागाचे कर्मचारी अशा एकूण २५ जणांच्या पथकाने शोधमोहीम करुन संपूर्ण जंगल पिंजून काढले. मात्र त्यांच्या हाती अपयश आले.
या शोधमोहीमेनंतरही बिबट्याचा शोध सुरु होता. वनविभागाने वारंवार या भागात जाऊन बिबट्याच्या अस्तित्वाचा काही पुरावा सापडतो का, याची पाहणी केली होती. मात्र वनविभागाला काहीही आढळून आले नाही.
रविवारी काही ग्रामस्थ याठिकाणाहून जात असताना त्यांना हा बिबट्या मृतावस्थेत झुडूपात आढळून आला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे शव आढळून आल्यानंतर याबाबतची खबर तात्काळ वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे या बिबट्याच्या पायाजवळ कोणतीही जखम नव्हती तर पोटाच्या ठिकाणी थोडेफार वळ दिसत होते.
त्यावरून फासकी त्याच्या पोटाला लागली असावी, असा ग्रामस्थांचा कयास आहे. या बिबट्याच्या तोंडात किडे पडले होते. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमका कधी झाला असावा, याचे गूढ वाढले आहे.
वनखात्याने याचा पंचनामा केला आहे. तसेच बिबट्याचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण उलगडणार आहे.